वर्धा : सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान हा वर्धा दौऱ्यावर येणार असल्याचे नियोजन आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कपचा पुरस्कर्ता म्हणून आमिरची गत काही वर्षांपासून ओळख झाली आहे. त्यासाठी तो राज्याच्या विविध भागात जात असतो. वर्धा जिल्ह्यात पण तो एकदा येऊन गेला आहे. आता २७ – २८ मार्च रोजी त्याच्या दौऱ्याचे घाटत आहे. स्ट्राबेरी उत्पादक म्हणून प्रसिद्ध झालेल्या भारती पाटील यांनी या भेटीचे सुतोवाच केले आहे. झाले असे की पाणी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमासाठी त्या पुणे येथे गेल्या होत्या. तत्पूर्वी त्यांच्या हिंगणघाट तालुक्यातील कात्री या गावी त्यांची स्ट्राबेरी फळाची शेती पाहण्यास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ हे येऊन गेले होते. त्याच वेळी कर्डीले यांनी या फळाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड वाढविण्याचा निश्चय केला. तसेच पुणे येथील कार्यक्रमाचे तिकीट पाटील यांना मिळवून दिले. त्या स्वतः तसेच सासरे शंकरराव पाटील हे मिळून पुणे येथे गेले.
हेही वाचा : ‘त्या’ मृत मजुरांच्या कुटुंबाने अनुभवली माणूसकी, भारावल्या स्थितीत परतीचा प्रवास
तिथे त्यांची भेट आमिर खान सोबत झाली. खान यांना भारती महेश पाटील यांनी स्ट्राबेरी पिकाची माहिती दिली. एवढ्या उष्ण हवामानात हे पीक फळवीत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. महेश पाटील यांनी आमचं यश पाहून जिल्ह्यात इतरही शेतकरी यां पिकाची लागवड करीत असून अकरा एकरवर लागवड झाली असल्याची माहिती दिली. त्यावर खान यांनी हे तर फारच कौतुकास्पद यश असल्याची पावती दिली. तसेच पुढील वर्धा दौऱ्यात मी ही शेती पाहण्यास येणार असल्याची हमी दिली. अशी माहिती पाटील यांनी दिली. हा कार्यक्रम २७ मार्च रोजी अपेक्षित असून गावी कात्री येथील भेट अत्यंत गोपनीय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पदव्युत्तर भत्त्याच्या निकषांवर वैद्यकीय शिक्षकांचा आक्षेप; नवीन वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षक मिळणार कसे?
उष्ण कटीबंधातील शेतीत हे थंड हवामान लागणारे पीक न घेण्याचा सल्ला पाटील कुटुंबास अनेकांनी दिला होता. पण तो अव्हेरून योग्य ती काळजी घेत हे पीक फुलविले. यावर्षी पाच एकरात ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न होण्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांच्या या फळाची चव ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाखली आहे. शिंदे यांनी तर त्यांच्या शेतातील स्ट्राबेरी पेक्षा ही स्ट्राबेरी मधुर असल्याची पावती दिली आहे. आता पाटील कुटुंबास आमीर खान यांच्या संभाव्य भेटीची उत्सुकता लागली आहे.