अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी बॉम्बसदृश्य वस्तू फेकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. कारागृहात बंदिस्त असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या साथीदारांनी कारागृहालगत अमरावती-नागपूर एक्सप्रेस बायपासवरून फटाके फोडून वाढदिवस साजरा केला आणि कारागृहाच्या परिसरात बॉम्बसदृश्य फटाके देखील फेकले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हर्षद शेरेकर (२२, रा. बुधवारा) आणि रोहित काळे (२५, रा. बेनोडा) अशी आरोपींची नावे आहेत. येथील यशोदा नगर परिसरातील गुंड प्रवीण बनसोड उर्फ पिंट्या हा हत्येच्या प्रकरणात अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. शनिवारी ६ जुलैला त्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याचे साथीदार हर्षद शेरेकर आणि रोहित काळे या दोघांनी कारागृहालगतच्या अमरावती नागपूर एक्सप्रेस बायपास मार्गावर रात्री फटाके फोडले. यानंतर या दोघांनी बॉम्बसदृश्य फटाके कारागृहाच्या आतमध्ये फेकले. यापैकी एक फटाका हवेतच फुटला तर दुसरा कारागृहात जाऊन पडला. यामुळे कारागृह प्रशासन हादरले होते.
हेही वाचा…“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका
घटनेची माहिती मिळतात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह पोलिसांचा ताफा कारागृह परिसरात पोहोचला. बॉम्बशोधक पथकाने कारागृहाच्या आतमध्ये पडलेला बॉम्बसदृश्य फटाका ताब्यात घेतला. यानंतर रात्रभर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. आजही पोलिसांनी कारागृहाचा परिसर पिंजून काढला. बायपास मार्गावर फटाक्यांचे अवशेष दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी शोध सुरू केला. कारागृहात बंदिस्त असलेला आरोपी प्रवीण बनसोड याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या साथीदारांनी कारागृहाच्या आतमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू फेकल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले. पोलिसांना कारागृहाच्या परिसरात आढळलेला बॉम्बसदृश्य चेंडू तपासणीसाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. या चेंडूत फटाक्याची बारूद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हेही वाचा…उदय सामंत म्हणाले ” लोकसभेत अपयश पण विधानसभा महायुती जिंकणार”
रोहित काळे हा गुंड प्रवीण बनसोडचा समर्थक आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याने चक्क कारागृहाच्या दिशेने फटका उडवल्याचे चौकशीत आढळून आले.
आरोपी रोहित काळे याने त्यासाठी यशोदानगरस्थित एका फटाका भंडारमधून ६०० रुपयांमध्ये एक डबल बार फटाका घेतला. कारागृहाच्या मागे बायपास मार्गावर पोहचून कारागृहाच्या दिशेने नेम धरत तो डबल बारचा फटाका तिरपा धरत त्याला खालून आग लावली. तो फटाका थेट कारागृहातील बॅरेक नंबर ६ व सातच्या मधोमध जाऊन पडला. पैकी एका बारचा स्फोट झाला. तर दुसऱ्या बारचा स्फोट न होता त्यातील बारूद व छऱ्यांनी भरलेला फटाक्यातील प्लास्टिक बॉल तेथेच पडला. तो बीडीडीएसने निकामी केला.
हेही वाचा…अमरावती : धक्कादायक… अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार; तोंडात, डोळ्यात टाकली वाळू
कारागृहाच्यामागून अमरावती नागपूर एक्सप्रेस बायपास मार्ग जातो. या मार्गाची उंची कारागृहाच्या भिंतीइतकी असल्याने या ठिकाणाहून यापूर्वी अनेकवेळा गांजा, खर्रा भरलेले चेंडू कारागृहाच्या परिसरात फेकण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. पोलिसांनी कारागृहाच्या भिंतीची उंची वाढविण्याबाबत कारागृह प्रशासनाला अनेकवेळा सूचना केली होती. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पोलिसांनी आता पुन्हा एकदा कारागृहाच्या भिंतींची उंची वाढविण्याची सूचना कारागृह प्रशासनाला केली आहे.