मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर किंवा पाठीवर हात फिरवणे हे लैंगिक शोषण मानले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा >>> अकोला : उच्चशिक्षित विवाहितेने अभियंता पतीला सोडून धरला प्रियकराचा हात; १४ महिन्यांच्या चिमुकलीचाही केला नाही विचार
या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २०१२चे हे प्रकरण आहे. तेव्हा आरोपी १८ वर्षांचा होता. १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात निरीक्षण नोंदवताना उच्च न्यायालयाने म्हटले की, ही कारवाई कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय करण्यात आली असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या पाठीवर थाप मारली आणि तू मोठी झाली आहेस, असे सांगितले. आरोपीने पीडितेला तिच्या लहानपणी पाहिले होते. न्यायमूर्ती म्हणाले की, पीडितेचे वय तेव्हा १२ ते १३ वर्षे असावे. आरोपीच्या वाईट हेतूबद्दल तिने काहीही सांगितले नाही. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.