नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सद्यस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २४ शिपायांची रिक्त पदे आहेत. येत्या दोन वर्षात आणखी १२ पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने एकूण ३६ पदांसाठी जाहिरात काढली आहे. या पदांसाठी खुल्या गटासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे ठेवण्यात आली आहे. अनुसुचित जाती व जमाती घटकासाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सुट दिली गेली आहे.
विशेष बाब म्हणजे, शिपाई पदासाठी १६ हजार रुपये ते ५२ हजार रुपये पगार दिला दिला जाणार असल्याचे जाहिरातीत उल्लेख करण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत संबंधित पदांकरित अर्ज करता येईल.
सातवी उत्तीर्णची अट
शिपाई पदासाठी अर्ज करण्यासाठी सातवी इयत्ता उत्तीर्णची अट ठेवण्यात आली आहे. याशिवाय उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवार हा निर्व्यसनी असावा अशी अटही ठेवण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तानुसार त्यांची यादी तयार करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांची लिखित परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा ही ३० गुणांची असून त्यात किमान १५ गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश राहील. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची १० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जातील. पात्र उमेदवारांना तोडी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
शिपाई पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज करायचा आहे. परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारणार येणार असल्याचे उच्च न्यायालय प्रशासनाने स्पष्ट केले. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून ते ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत अर्ज करता येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराला ५० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. अर्ज भरताना जन्म तारखेचा पुरावा, सातवी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झाले असल्यास त्यांची गुणपत्रिका, जातीचा दाखला, दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेला चारित्र्य प्रमाणपत्र, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रे सादर करायची आहे. ही कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी उमेदवाराला सादर करायची आहे. अर्ज करताना केवळ पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक राहील. शिपाई पदाबांबत वेळोवेळी उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर माहिती प्रकाशित केली जाणार आहे.