नागपूर : तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नागपूरमध्ये अस्थिमज्जा नोंदीच्या (बोनमॅरो रजिस्ट्री) उद्घाटनाच्या वेळी मोठा कार्यक्रम केला होता. त्यावेळी राज्यातील इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध झाली नाही. दुसरीकडे या शहरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मात्र ही सोय झाली असून दोघांवर प्रत्यारोपणही झाले आहे.
अस्थिमज्जा प्रत्यारोपण ही किचकट व महागडी उपचार पद्धती आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया, रक्ताच्या कर्करोगासह इतरही अनेक आजाराच्या रुग्णांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपणातून कायमचा उपचार शक्य आहे, परंतु महागडा उपचार असल्याने गरीब व मध्यमवर्गीयांना हा उपचार झेपत नाही. त्यामुळे उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होतो.
नागपूरमधील ‘एम्स’मध्ये मात्र दोन रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. त्यापैकी एक १२ वर्षीय मुलगा हा मध्यप्रदेशचा आहे. या विषयावर ‘एम्स’च्या ‘मेडिकल हेमॅटोलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. राहुल अरोरा म्हणाले, या मुलाच्या रक्ताच्या पेशीत दोष होता. त्यामुळे त्याच्या शरीरात नवीन रक्त तयार होत नव्हते. त्याच्या बहिणीच्या अस्थितून अस्थिमज्जा घेऊन ते रुग्णावर प्रत्यारोपित केले. आता रुग्णाची प्रकृती चांगली आहे. एका १७ वर्षीय मुलीच्या मेंदूत कर्करोग (ब्रेन लिंफोमा) होता. तिच्या शरीरातूनच अस्थिमज्जा घेऊन ते तिच्याच प्रत्यारोपित केल्याने तिचीही प्रकृती सुधारत आहे. या प्रकल्पासाठी ‘एम्स’च्या संचालिका डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कोणत्या रुग्णालयात असे प्रत्यारोपण होत असल्याचे ऐकले नाही, परंतु कुठे प्रत्यारोपण होत असल्यास माहिती घेऊन कळवतो.