नागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर होणार असले तरी त्याबाबतची उत्सूकता कमालीची वाढली आहे. कोण जिंकणार ? कोण हरणार हा प्रत्येक मतदारसंघातील चर्चेचा प्रमुख विषय आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती पुन्हा सत्तेत येणार की महाविकास आघाडीला संधी मिळणार याबाबत अंदाज बांधले जात आहे. काठावर बहुमत मिळाले तर अपक्षांची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन दोन्ही आघाड्यांकडून विजयी होण्याच्या स्पर्धेत असणाऱ्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधले जाात आहेत. नागपूर जिल्ह्यातील दोन अपक्षांबाबत सध्या याबाबत चर्चा आहे
उमरेड या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे संजय मेश्राम, भाजपचे सुधीर पारवे यांच्यासह भाजपचे बंडखोर प्रमोद घरडे यांच्यात लढत आहे. २०१९ मध्ये उमरेडची जागा काँग्रेसच्या राजू पारवे यांनी भाजपकडून हिसकावून घेतली होती. पण यानिवडणुकीत तेच भाजपवासी झाले. पण भाजपने येथून माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी दिली. प्रमोद घरडे हे भाजपकडून लढण्यास इच्छुक होते. त्यांनी तयारीही केली होती. पण ऐनवेळी पारवे यांचे पारडे भारी ठरले. त्यामुळे घरडे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली, लोकांकडून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता ते स्पर्धेतील उमेदवार ठरले आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमरेडची लढत काँग्रेसचे संजय मेश्रामविरुद्ध अपक्ष प्रमोद घरडे यांच्यातच झाली,असे मतदार सांगतात. त्यामुळे युती आणि आघाडीच्या नेत्यांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा…राजकीय स्फ़ोट ! अर्ज मागे नसता घेतला तर बरं झालं असतं, असे म्हणत दादाराव केचे यांची घोषणा,,,
दुसरी जागा रामटेक विधानसभेची आहे. येथे काँग्रेस बंडखोर हे पहिल्या दिवसापासूनच तुल्यबळ उमेदवार म्हणून पुढे आले आहे. महाविकास आघाडीत जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली तरी काँग्रेसचे खासदार, नेते झाडून सर्व कार्यकर्ते मुळक यांच्या प्रचारात लागले होते. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष अशीच त्यांची उमेदवारी आहे. त्यामुळे ते विजयी झाल्यास ते काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, मात्र तरीही भाजपने प्रयत्न सोडलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हे दोन अपक्ष उमेदवार मतमोजणीाचा कल स्पष्ट होईपर्यंत चर्चेत राहणार आहे.
हेही वाचा…पंतप्रधान मोदी, राहूल गांधींची सभा झालेल्या या मतदारसंघात झाले ८१ टक्के विक्रमी मतदान
काँग्रेसने विदर्भातील विजयी उमेदवारांना तातडीने मुंबईला नेण्यासाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था केली आहे. यावरून मतमोजणींनंतर सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या जुळवाजुळवीचा अंदाज येतो. अशा परिस्थितीत अपक्षांना महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप बंडखोरांशी त्यांच्या पक्षासह इतरही पक्ष संपर्क साधून ठेवत आहे. उमरेड आणि रामटेकच्या मतदारांचा कौल राहतो व त्यात कोण बाजी मारते यावरच सारे काही अवलंबून आहे.