‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय लवकरच समोर येणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना या प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला.
नक्की वाचा >> ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरणातील ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं: शरद पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय…”
मुंबईमधील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्कासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद सुरु आहे. या निवडणूक चिन्हासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याची विनंती एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. मात्र ठाकरे गटाने या मागणीला कडाडून विरोध केला आहे. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं सादर केली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी आणि सत्यता तपासून पाहिल्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. फक्त पोटनिवडणुकीसाठी हंगामी आदेश देऊन निवडणूक चिन्ह गोठवण्यात येऊ नये, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. पुरावे सादर करण्यासाठी आज (८ ऑक्टोबर २०२२ ची ) दुपारी दोन वाजेपर्यंतचा अंतिम वेळ दोन्ही गटांना देण्यात आला आहे.
नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”
शिंदे गटाच्या वतीने वकील चिराग शाह यांनी निवडणूक चिन्हाच्या हक्कासंदर्भातील कागदपत्रं सादर केली. ४ ऑक्टोबर रोजी शाह यांनी ही सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ‘धनुष्य-बाण’ या निवडणूक चिन्हाचा वापर करू देण्याची मागणी शिंदे गटाने आयोगाकडे केली आहे. त्यासंदर्भात आपली बाजू मांडताना ठाकरे गटाने उत्तर आणि कागदपत्रे आयोगासमोर शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत सादर केलेली नाहीत. आवश्यक कागदपत्रे शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करावीत, असे पत्र आयोगाने ठाकरे गटाला पाठवले आहे. ‘‘दोन्ही गटांना कागदपत्रांसाठी ७ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती,’’ असे आयोगाने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आज शिवसेना आपली भूमिका आयोगासमोर कागदपत्रांच्या माध्यमातून मांडणार आहे.
नक्की वाचा >> “…तर याही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळाव्यातील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी
संपूर्ण राज्यासहीत देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निकालासंदर्भात शरद पवार यांनी आज सकाळी प्रतिक्रीया दिली. “शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहेत. यासंदर्भात काय सांगाल?” असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. नागपूर विमातळावर पत्रकारांशी संवाद साधत असताना हा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी, “मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी “त्यांचा (निवडणूक आयोगाचा) निर्णय जो काही असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल,” असंही सांगितलं.