नागपूर : एका महिला आपल्या चार वर्षीय मुलाला कडेवर घेऊन फुटाळा तलावावर आली. ती तलावाच्या काठावर बसून विचार करीत होती तर तिचा मुलगा शेजारी खेळत होता. तासभर झाल्यानंतर ती महिला घाईघाईने तलावाच्या पायरीवरुन उठली. तिने मुलाला कडेवर घेतले. लगेच तलावाच्या दिशेने धाव घेऊन अचानक पाण्यात उडी घेतली.

ही घटना तलावाच्या काठावर बसलेल्या काही युवकांच्या लक्षात आली. युवकांनी लगेच पाण्यात उड्या घेतली. लहान बाळाला सर्वप्रथम बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महिलेला बाहेर काढण्यात आले. मायलेकांच्या पोटात पाणी गेल्यामुळे दोघेही बेशुद्ध झाले. मायलेकांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचे प्रकृती स्थिर असून मुलावर उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. किर्ती (३०, रा. टेकानाका) आणि कियांश (४) अशी मायलेकांची नावे आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेका नाका येथे राहणाऱ्या मनोज हे एका धार्मिक स्थळावर काम करतात. ते पत्नी किर्ती आणि मुलगा कियांश याच्यासोबत किरायाने राहतात. गेल्या काही दिवसांपासून किर्ती या तणावात वावरत होत्या. त्याकडे पती मनोजचे दुर्लक्ष झाले. घरातील वातावरणही तणावपूर्ण होते. सोमवारी किर्ती या मुलगा कियांशला घेऊन टेका नाका येथून सिताबर्डीला आल्या. तेथून त्या फुटाळा तलावावर गेल्या. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. जवळपास तासभर फुटाला तलावाच्या काठावर बसल्यानंतर किर्ती यांनी मुलाला कडेवर घेतले. त्यानंतर थेट तलावात उडी घेतली.

काही युवक तलावाच्या काठावर बसले होते. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात उडी घेतली. सर्वप्रथम चार वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महिलेला बाहेर काढण्यात आले. दोघांच्याही पोटात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. ही घटना घडताच तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मायलेकाला नागरिकांनी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या छातीत पाणी घुसल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्याची प्रकृती सध्या नाजूक असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची नोंद अंबाझरी पोलिसांनी केली आहे.

युवकांमुळे वाचले मायलेकाचे प्राण

सोमवारी ईदची कॉलेजला सुटी असल्यामुळे काही युवक तलावाच्या काठावर बसलेले होते. गप्पा करीत असतानाच किर्ती यांनी अचानक तलावात उडी घेतली. त्याकडे त्या युवकांचे लक्ष गेले. त्या युवकांनी लगेच पाण्यात उड्या घेतल्या. दोघेही मायलेकांना पाण्यातून बाहेर काढून जीवदान दिले.