नागपूर : मुलगा क्रिकेट सट्टेबाजी लाखांमध्ये रक्कम हारल्यामुळे आई-वडिलांनी आरडाओरड केली. घरातील वाद आणि सट्टेबाजीमुळे झालेल्या कर्जामुळे तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्युमुळे नैराश्यात गेलेल्या आईनेही विष प्राशन करून आत्महत्या केली.मायलेकाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे उपराजधानी हादरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. खितेन नरेश वाघवानी (२०) आणि दिव्या वाघवानी असे मृत मायलेकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोठे मसाले व्यावसायिक नरेश वाघवानी यांचा मुलगा खितेन हा वडिलांचे मसाला विक्रीत मदत करीत होता. तो शिक्षणही घेत होता. मात्र तो चुकीच्या संगतीत लागला व काही तरुणांमुळे त्याला क्रिकेट सट्टेबाजीच्या जुगाराची व्यसन लागले.
हेही वाचा >>>गोंदिया : दोन चालकांच्या भांडणात ट्रेलर सुटला अन् थेट खासदाराच्या वाहनाला धडकला; पुढे काय झाले वाचा..
मागील वर्षी तो सट्ट्यात काही लाख रुपये हारला होता. मात्र, ही बाब त्याने कुटुंबियांना सांगितली होती व त्याचे वडील ते पैसे हळूहळू देत होते. खितेनने यावर्षी परत मित्रांच्या सांगण्यावरून आयपीएलच्या सामन्यांवर पैसे लावले. गेल्या महिन्याभरात तो जवळपास ६ ते ७ लाख रुपये हारला. सट्टेबाज पैशांसाठी त्रास देऊ लागले व यातून खितेन तणावात गेला. रविवारी रात्री त्याचे कुटुंबिय हुडकेश्वरमध्ये असलेल्या लग्नसमारंभासाठी गेले होते. घरी कुणीच नसताना त्याने स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री बारा वाजता कुटुंब लग्नावरून घरी परतले. त्यांना खितेन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला तातडीने खाली उतरवून एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?
मुलाने आत्महत्या केल्याचे दु:ख त्याची आई दिव्या पचवू शकली नाही. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. सकाळी मुलावर अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. मुलाच्या मृत्यूनंतर आयुष्यात काहीच राहिले नाही, अशी भावना दिव्या यांना झाली. त्यांनी सकाळच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय खितेनच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना त्याच्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे कुटुंबियांचे लक्षात आले. दिव्या त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांनादेखील मृत घोषित केले. या प्रकारामुळे खितेनचे वडील व बहीण अक्षरश: कोलमडले आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लकडगंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्ज वसुलीसाठी तगादा लावणारे रडारवर
खितेन सट्टेबाजीत हारलेली रक्कम वसूल करण्यासाठी काही बुकी त्याच्या घराच्या खाली येत होते. त्याला पैशासाठी धमकी देत होते. त्याची दुचाकी बुकींनी हिसकावून घेतली होती. तसेच त्याचा फोनही पैशाच्या बदल्यात हिसकावून घेतला होता. पैशासाठी वाढता दबाव आणि तगादा पाहता खितेनने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.