नागपूर: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्यानंतर तिच्या आईच्या खात्यातील दीड लाख प्रियकराने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रियकरला अटक केली. प्रफुल्ल रामचंद्र बले (३५, पिरॅमीड सिटी, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २४ वर्षीय नेहा (काल्पनिक नाव) हिच्या आईला करोना झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना आरोपी प्रफुल्लशी ओळख झाली. एकमेकांना मदत केल्यामुळे त्यांनी मोबाईल क्रमांक घेतले. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. काही दिवस त्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहिले. दरम्यान नेहाच्या आईचे निधन झाले. ती एकाकी पडल्याने प्रफुल्लने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला सांत्वना देण्यासाठी तो नेहमी तिच्या घरी यायला यागला.
हेही वाचा… माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, राष्ट्रवादीचे सोडून गेलेले आमदार पुन्हा परतणार…
प्रफुल्लने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर प्रफुल्लने तिला स्वत:च्या घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. तिला लवकरच लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. नेहाच्या आई-वडिलाचे निधन झाल्यामुळे तिच्या घरी प्रफुल्ल राहायला आला. काही दिवस दोघांमध्ये सुरळीत सुरु होते. दरम्यान, प्रफुल्लला जुगाराचे व्यसन लागले. त्याने नेहाच्या मृत आईच्या आधारकार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करीत ‘लोन अॅपॅवरून २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. नेहाच्या पैशावर तो मौजमजा करायला लागला. लग्नाबाबत विषय काढल्यानंतर तो नेहमी टाळाटाळ करीत होता. काही महिन्यांनी बँकेतून कर्ज भरण्यासाठी नोटीस आला. त्यामुळे नेहाला आश्चर्य वाटले.
हेही वाचा… नागपूर विभागात ‘चिकन गुनिया’चे रुग्ण सहापट; ‘या’ जिल्यात सर्वाधिक रुग्ण
मृत पावलेली आई कर्ज कशी घेऊ शकते, असा जाब बँक अधिकाऱ्यांना विचारला असता सर्व सत्य समोर आले. प्रफुल्लचे काळे कारनामे उघडकीस आले. त्यामुळे चिडलेल्या नेहाने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रफुल्ल बलेला अटक केली.