गडचिरोली : दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मात्र, काही दिवसातच प्रियकराने तिला टाळणे सुरू केले, मारहाणही करायचा. हा प्रकार सहन न झाल्याने चामोर्शी येथील युवतीने मृत्यूला कवटाळले. १० ऑगस्ट रोजी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घराची स्वच्छता करताना सापडलेल्या चिठ्ठीमुळे तरुणीच्या आत्महत्येमागील खरे कारण समोर आले. याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी प्रियकर सौरभ अधिकारी घोट येथे राहतो. युवती दोन वर्षांपासून नागपूर येथे शिक्षण घेत होती. १७ जुलैला नीटची परीक्षा दिल्यानंतर ती घरी आलेली होती. मात्र, घरी आल्यापासून ती खूप तणावात होती. अखेर १० ऑगस्टला तिने गळफास घेत जीवन संपविले. २० ऑगस्टला युवतीची आई खोलीची स्वच्छ्ता करीत असताना तिला दोन महिन्यांपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात सौरव अधिकारी आणि माझ्यात प्रेम संबंध आहे. पण तो मला खूप मानसिक त्रास देतो. आता लग्न करण्याससुद्धा नकार देत असल्याने जीवन जगणे असह्य झाले आहे, असा मजकूर त्यात होता. यावरून पोलिसांनी सौरभ अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .