नागपूर : आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर प्रेयसीने प्रियकराला लग्नास नकार दिला. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रियकराने प्रेयसीच्या वडिलाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता जाततरोडीत घडली. नरेश (५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निलेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम (३५, रामबाग) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेशसह त्याच्या मित्रालाही अटक केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश मेश्राम हा गुन्हेगार प्रवृत्तीचा युवक असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो बारावीत असताना त्याची वर्गमैत्रिण दिशा (बदललेले नाव) हिच्याशी प्रेमसंबंध होते. २०१६ पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, २०१९ मध्ये निलेशने एका युवकाचा खून केला. या हत्याकांडात निलेश कारागृहात गेला. तर दुसरीकडे दिशा नोकरीवर लागली. निलेश २०२१ मध्ये कारागृहाबाहेर आला. तो बाहेर येताच प्रेयसी दिशाला भेटायला गेला. मात्र, तिने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्याला नकार पचवता आला नाही. त्यामुळे त्याने तिला मारहाण केली. दिशाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन निलेशला अटक केली. तो पुन्हा कारागृहात गेला. तो काही दिवसांनंतर बाहेर आल्यानंतर दिशा आणि निलेशने न्यायालयातून ते प्रकरण मागे घेतले. तेव्हापासून तो तिला त्रास देत नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांंपासून तो दिशाला लग्न करण्यासाठी विचारणा करीत होता. ती वारंवार तिला नकार देत होती. तिने वडिलांकडे निलेशची तक्रार केली. 

निलेशने काढला प्रेयसीच्या वडिलांचा काटा

वडिलांच्या दबावामुळे दिशा लग्नास नकार देत असल्याचे निलेशला वाटत होते. त्यातच नरेश यांनी निलेशला दरडावले. मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या निलेशने नरेश यांचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी दुपारी दोन वाजता निलेश हा मित्र ईश्वर ऊर्फ जॅकी सोमकुवर याच्यासह दुचाकीने जाततरोडी पोलीस चौकीजवळ आला. दोघांनीही नरेश यांच्यावर चाकूने भोसकून ठार केले. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलीस चौकीजवळच खून

गुन्हेगारांची हिम्मत एवढी वाढली आहे की चक्क पोलीस चौकीजवळच खून केला. या हत्याकांडाच्या घटनास्थळाच्या अगदी काही अंतरावर जातरोडी पोलीस चौकी आहे. या चौकीत ४ ते ५ पोलीस कर्मचारी नेहमी हजर असतात. तरीही अगदी हाकेच्या अंतरावर हत्याकांड घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.