नागपूर : प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तरुणीने लग्न करण्यास किंवा प्रेमात दगा दिल्यास प्रियकर थेट तिच्या कुटुंबीयांच्या जीवावर उठतो. तो कुटुंबीयांना मारहाण करणे, धमकी देणे किंवा थेट खून करण्यापर्यंत मजल मारतो. गेल्या तीन दिवसांत अशाच प्रकारच्या दोन घटना उपराजधानीत उघडकीस आल्या आहेत.

लकडगंजमध्ये प्रेमात दगा देणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून प्रियकराने वडिलाला मारहाण केली तर इमामवाड्यातील घटनेत मुलीच्या प्रियकराने वडिलाचा चाकूने भोसकून खून केला. प्रेमप्रकरणात तरुणीने दगा दिल्यानंतर कुटुंबीयांवर हल्ला करण्याच्या बऱ्याच घटना नागपुरात घडल्या आहेत.

पहिल्या घटनेत, दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचे वस्तीतच राहणाऱ्या तन्मय देवराव धकाते (१९) रा. लकडगंज या युवकाशी सूत जुळले. दोघांच्याही शाळा एकाच रस्त्यावर होत्या. त्यामुळे दोघांचे सोबतच शाळेत येणे-जाणे होते. दरम्यान, दोघांचे सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध होते. तन्मय धकाते याने आयटीआयला प्रवेश घेतला असून तो प्रथम वर्षाला आहे. परिसरातच राहणाऱ्या रियाशी (बदललेले नाव) त्याची ओळख होती. तो रियावर एकतर्फी प्रेम करीत होता. रिया दहावीत तर तन्मय बारावीत शिकत होते. यादरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची चर्चा वस्तीत होती. दोघेही एकमेकांशी प्रेमविवाह करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्या रियाच्या आयुष्यात वर्गमित्र आला. दोघेही सोबत शिकत असल्यामुळे एकमेकांप्रती आकर्षण वाढले. तिने तन्मयकडे दुर्लक्ष करुन वर्गमित्राशी प्रेमसंबंध ठेवले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यामुळे रियाने तन्मयशी बोलचाल बंद केली होती. त्यामुळे तो शाळेत येता-जाताना तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र रिया त्याला प्रतिसाद देत नव्हती. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तो रियाच्या घरासमोर आला. रस्त्यावरील दगड उचलून रियाच्या घरावर दगडफेक सुरु केली. रियाची आई-वडील घरातून बाहेर आले. त्यांनी तन्मयला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याने दोघांनाही शिविगाळ सुरू केली. विरोध केला असता तन्मयने रियाच्या वडिलांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. भांडण होत असल्याने आसपासचे लोक गोळा झाले. त्यामुळे तन्मयने तेथून पळ काढला.

घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली. लकडगंज ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ बयान नोंदवत तन्मयविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आली