यवतमाळ : वणी येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये सोमवारी एका तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या घटनेचा उलगडा करण्यात वणी पोलिसांना यश आले. संशयाचे भूत डोक्यात गेलेल्या प्रियकरानेच डोक्यावर प्रहार करून प्रेयसीचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी येथून अटक केली आहे.
प्रिया रेवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे (२५, रा. बोर्डा, जि. चंद्रपूर, ह.मु.वणी), असे मृत तरुणीचे नाव आहे. विनोद रंगराव शितोळे (२५, रा. शिरोळी, ता. वसमत, जि. हिंगोली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तरुणी ही कृष्णा अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये दोन महिन्यांपासून भाड्याने राहत होती. सोमवारी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटमालक राकेश डुबे (रा. गोकुळनगर) यांनी वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता. पोलिसांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला तेव्हा प्रिया दरवाजासमोर मृतवास्थेत पडलेली होती. तिचे शरीर फुगलेल्या व सडलेल्या स्थितीत होते. डोक्याखाली रक्त पडल्याचे दिसून आले.
तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला, हे रहस्य उलगडण्यासाठी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनात तरुणीचा मृत्यू हा डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे समोर आले. तरुणीची आई सुनंदा बागेसर यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांना माहिती मिळाली की, प्रिया उर्फ आरोहीची मैत्री एका तरुणासोबत फेसबुकद्वारे झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. या माहितीवरून पोलिसांनी तिचा प्रियकरानेच गेम केला असावा, या दृष्टीने तपास सुरू केला.
हेही वाचा – पाळीव प्राण्यात उष्माघाताचा सर्वाधिक धोका ‘याच’ एका पशूला, कारण काय? जाणून घ्या…
पोलिसांनी अधिक माहिती घेतली तेव्हा विनोद गावी पळून गेल्याची खात्री झाली. प्रियकराच्या नावाव्यतिरिक्त पोलिसांकडे दुसरी कोणतीही माहिती नव्हती. पोलीस पथकाने कौशल्याचा वापर करून विनोदचे हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गाव गाठून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रियाच्या चारित्र्यावर संशय घेवून खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे आदींनी केली.