नागपूर : मनशांतीसाठी ध्यान वर्गाला जात असताना ओळख झालेल्या तरुणाने एका शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे दोन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे शिक्षिकेने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कुणाल गुलाब पैदलवार (३४, गुरुदेवनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तरुणी रंजू (काल्पनिक नाव) ही नंदनवनमध्ये राहते. ती मूळची कन्हानची असून नागपुरातील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. ती एम.कॉम द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. २०१८ मध्ये मनशांतीसाठी ध्यानवर्गाला जात होती. त्याच वर्गात आरोपी कुणाल गुलाब पैदलवार याच्याशी ओळख झाली. त्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप होता. त्यामधून कुणालने रंजूचा मोबाईल क्रमांक घेतला. तिच्याशी चॅटिंग केली. दोघांची चांगली मैत्री झाली. कुणाल हा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. करोनाच्या पहिल्या लाटेत तिचा रस्तेअपघात झाला. त्यामुळे तिला मदत करायला कुणाल तिच्या खोलीवर जात होता. त्याने तिची सेवा केली. यादरम्यान दोघांचे सूत जुळले.

हेही वाचा – लोकसत्ताच्या बातमीनंतर प्रदूषण कंट्रोल बोर्डाला आली जाग, डांबर प्लांटमधील प्रदूषित धुरामुळे अनेकांना त्वचारोग

हेही वाचा – ‘‘मंत्रिपदासाठी दावेदारी करणाऱ्या आमदारास शिवीगाळ शोभते काय?”, आमदार दादाराव केचेंप्रती संताप

अपघात झाल्यानंतर त्याने तिची चांगली काळजी घेतली. कुणालने तिला प्रेमाची मागणी घातली. दोघांनीही सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघांचे प्रेमसंबंध वाढत गेले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्याच्या नावाखाली तो तिचे लैंगिक शोषण करायला लागला. तिला पत्नीप्रमाणे वागवायला लागला. रंजूच्या आई-वडिलांनी तिला लग्नाबाबत विचारणा केली असता तिने कुणालला घरी बोलावून ओळख करून दिली. तिच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत बोलणी केली. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कुणाला लग्नाचा विषय काढल्यानंतर टाळाटाळ करीत होता. १५ फेब्रुवारीला तो तिच्या खोलीवर आला. त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्नास नकार दिला. तिने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कुणालचा शोध सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend rape teacher in nagpur adk 83 ssb