लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : प्रेयसीला वयाचे १८ वर्षे पूर्ण होण्यास काही दिवस शिल्ल्क असतानाच तिने प्रियकराकडे पळून जाण्याचा हट्ट केला. प्रियकराने काही दिवसांपर्यंत टाळाटाळ केली. मात्र, प्रेयसीच्या हट्टापोटी त्याने तिला पळवून नेले. तीन महिन्यांनंतर पोलिसांनी दोघांनाही पकडले. मुलीची रवानगी सुधारगृहात केली तर प्रियकर थेट कारागृहात पोहचला. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
आरोपी शुभम गायकवाड (रा. चंद्रमणीनगर) याने एका नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्याच्या वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर दोघेही मायलेक राहत होते. सुरुवातील पुणे-मुंबई येथे नोकरी केल्यानंतर आईच्या प्रकृतीच्या कारणामुळे तो घरी परतला. नागपुरात तो प्लम्बिंगचे काम करायला लागला. त्याची फेसबुकवरून प्रिती (काल्पनिक नाव) या तरुणीशी ओळख झाली. दोघांनीही काही दिवस एकमेकांशी मोबाईलवर ’चॅटिंग’ केली. प्रितीच्या आईचे निधन झाले असून ती वडील, दोन भाऊ आणि बहिणीसह राहते. शिक्षण सुरु असलेली प्रिती शुभमच्या प्रेमात बुडाली. दोघांच्याही वारंवार भेटी व्हायला लागल्या. दोघेही चित्रपट बघायला आणि बाहेरगावी फिरायला जाऊ लागले. तिने शुभमच्या प्रेमापोटी शाळा सोडून दिली आणि शुभमच्या प्रेमात पडली.
आणखी वाचा-आता नागपूर रेल्वे स्थानकावरून कॅबमध्ये बसता येणार, काय झाला निर्णय?
दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. तिचे वय १७ वर्षे असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शुभम तिची समजूत घालत होता. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर प्रेमविवाह करु असे आश्वासन देत होता. मात्र, प्रिती नेहमी लग्न करण्यासाठी हट्ट करायची. त्यामुळे गेल्या १४ ऑक्टोबरला शुभमने नाईलाजास्तव पळून जाण्यासाठी तयार झाला. प्रिती मध्यरात्रीच्या सुमारास घरात तयारी करून बसली होती. दरम्यान, शुभम तिच्या घराच्या पाठीमागे पोहचला. दोघांनीही पळ काढला आणि बाहेरगावातील नातेवाईकाचे घर गाठले. दुसरीकडे प्रितीच्या वडिलांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि प्रितीचा शोध सुरु केला.
असा लागला सुगावा
शुभम आणि प्रिती हे दोघेही नागपुरात परत आले आणि चंद्रमनीनगरात भाड्याने खोली घेऊन पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. वाठोड्याचे नवनियुक्त ठाणेदार विश्वानाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नत्थूजी ढोबळे, विष्णू मेहर यांनी तांत्रिक तपास केला. दोघांनाही हुडकून काढले. प्रितीची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली तर तिचा प्रियकर शुभम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सहायक निरीक्षक वनमाला पारधी करीत आहेत. केवळ प्रेयसीच्या हट्टापोटी प्रियकराच्या हातात बेड्या पडल्या.