नागपूर : आधीच्या काळात गुरुकुलात मुलगा शिकून परत आल्यानंतर आई-वडिलांना त्याचा खूप अभिमान वाटायचा. कारण, गुरुकुलात विषय, व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासाचे शिक्षण मिळत होते. आता गुरुकुल राहिले नाहीत म्हणून मुलांना वसतिगृहात पाठवले जाते. परंतु, वसतिगृहामधून परतणाऱ्या मुलांमध्ये नैतिकता उरत नाही, असा अजब तर्क माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी माडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विद्यापीठ शिक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनानक भवन येथे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’वर गुरुवारी कार्यशाळा पार पडली. यावेळी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : जाणीव व जागृती’ या विषयावर डॉ. चांदेकर बोलत होते. ते म्हणाले, गुरुकुलाच्या रूपातील भारताचा सांस्कृतिक वारसा नष्ट झाल्याने समाजच उभा राहू शकला नाही. आधुनिक शिक्षणामधून राष्ट्र तसेच समाजासाठी उभे राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अपेक्षित विकास झाला नाही. आजचे सर्व शिक्षण भौतिकतेकडे चालले आहे. मनुष्य निर्माणाची संधी देणारे शिक्षण असावे, असे स्वामी विवेकानंद सांगायचे.
हेही वाचा >>> नागपूरमध्ये अंबाझरी तलावासह धरणेही तुडुंब, पावसाळी पर्यटनही जोरात
मनुष्य निर्मितीला रोजगाराची जोड देणारे शिक्षण देण्याची आज गरज आहे. मनापासून स्वीकारणार नाही तोपर्यंत नवीन शैक्षणिक धोरण सोपे वाटणार नाही. सर्वच क्षेत्रात भारत स्वावलंबी व्हावा, रोजगार निर्मितीक्षम नवीन पिढी तयार व्हावी, तरुणाईचे संपत्तीत रूपांतर व्हावे म्हणून वर्तमान काळात हे धोरण गरजेचे आहे, असेही चांदेकर म्हणाले. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, शिक्षक महासंघाच्या उपाध्यक्ष डॉ. कल्पना पांडे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. संजय कविश्वर, डॉ. शामराव कोरेटी, डॉ. प्रशांत कडू आदींची उपस्थिती होती. शिक्षण मंचचे महामंत्री डॉ. सतीश चाफले यांनी प्रास्ताविक केले.
ज्ञानाचा वारसा सांगा – डॉ. कल्पना पांडे
आपणास भारतीय संस्कृतीत ज्ञान परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. भारतीय ज्ञान परंपरेचा हा वारसा आपण पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. पायथागोरस प्रणाली भारतीय ज्ञान परंपरेचा भाग आहे. त्यामुळे जुना भारत कसा होता हे नवीन पिढीला सांगावे लागणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याच भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश केला आहे, असे कल्पना पांडे म्हणाल्या.