यवतमाळ : परिस्थिती कितीही बिकट असली तरी मनाची स्थिती मात्र उत्तम ठेवायलाच हवी, तरच आपण जीवनात शांती, सुख आणि ज्ञान प्राप्त करू शकतो. आपण परिस्थितीमुळे घडत नाही, तर आपल्या मन:स्थितीमुळे घडत असतो, असा कानमंत्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राजयोगी शिक्षिका शिवानी दीदी यांनी दिला. शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ येथे आयोजित ‘खुशनुमा जीवन जीने की कला’ या व्याख्यानात त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासक दादी प्रकाशमणी यांच्या स्मरणार्थ प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाने जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत यवतमाळच्या शाखेने एकदिवसीय संवाद शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना शिवानी दीदी म्हणाल्या, ज्यावेळी परिस्थिती विक्राळ रूप धारण करते. त्यावेळी आपण हरतो. अशावेळी आपल्या मनाची स्थिती उत्तम असेल तरच आपण त्यावर मात करून पुढे जाऊ शकतो.

हेही वाचा – महिन्यात दुसऱ्यांदा ‘सुपरमून’! सप्ताहामध्ये तीन खगोलीय घटनांची पर्वणी; चंद्र सात टक्के मोठा दिसणार

मनाची स्थिती ही संस्कारातून मिळत असते. यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा उपयोग करायचा असतो. कलियुगाचे आणि सत्ययुगाचेही निर्माते आपणच असणार आहोत. आपण काम, क्रोध, द्वेष, अहंकार या विचारांना सतत बाळगण्याचे काम करतो. त्याऐवजी आपण सर्वांप्रती सदिच्छा व्यक्त केल्या आणि त्या दृष्टीने काम केले तर सत्ययुगाची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी दिला. राजयोग, ज्ञान, आध्यात्म हे आपल्याला मनाचे विज्ञान आपण समजून घ्यावे असे सांगते. सकारात्मक विचार माणसाचे आयुष्य बदलवू शकते. घरातील ऊर्जा घराची दिशा बदलवू शकते. आपले शब्द मनाची स्थिती भक्कम करू शकते. यामुळे प्रत्येक शब्द जपून वापरला पाहिजे. शब्दातून संस्कार घडत असतात. दुसऱ्यांप्रती मनात कायम सदभावना असल्या तर समोरच्या व्यक्तीपर्यंत ते विचार पोहोचतात. त्यातून नाते मैत्रीपूर्ण होतात, असे त्या म्हणाल्या. आपल्याकडे सतत उणीव आणि नकारात्मक विचार असतील तर आपल्याला तेच परत मिळेल. त्यामुळे सदैव सकारात्मक विचार केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ओम शांती परिवारातील सदस्या यवतमाळ केंद्राच्या संचालिका मंगला दीदी, नम्रता दीदी, छाया दीदी यांनी शिवानी दीदीचे स्वागत केले. दमयंती दीदी आणि बी.के. ऋतुजा दीदी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. व्याख्यानास यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील नागरिकांनी गर्दी केली होती.

पैशाने मन:शांती खरेदी करता येत नाही

सगळ्यांनाच वाटतं आपण नेहमी आनंदी असावं. पण, हा आनंद पैशाने खरेदी करता येतो का? आणि जर पैशाने आनंद मिळविता येत नसेल तर आपण एवढी मेहनत कशासाठी करतो? कष्ट घ्यावे लागतील, प्रयत्नही करावे लागतील. प्रकृती चांगली राहावी असे वाटत असेल तर शरीराकडे लक्षही द्यावे लागेल तसेच आनंदाचे आहे. आपण नेहमी खुश राहावे असं वाटत असेल तर मनाकडेही लक्ष द्यावे लागेल, त्याला प्रफुल्लित ठेवावे लागेल, असा सल्ला शिवानी दीदी यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – दक्षिण मध्य रेल्वेच्या आठ गाड्यांना मुदतवाढ, ‘या’ शहरांमध्ये जाण्यासाठी झाली सुविधा

ओम शांतीचा अर्थ मी शांत स्वरुपातील आत्मा आहे, असा होतो. सर्व गोष्टी पैशांतून खरेदी करू शकत नाही तर मनःशांती आपल्या आत्म्याचे मूळ स्वरूप आहे. संस्कारातून ते प्रतीत होते. मुलांवर आपण शिक्षणासाठी ज्या पद्धतीने जोर देतो त्या पद्धतीने संस्कारावर भर दिला तर उद्याचे विश्व उत्तम घडेल. आरोग्य नैसर्गिकरित्या उत्तम असते. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यात बिघाड होतो, असेही त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmakumari shivani didi lecture concluded at yavatmal nrp 78 ssb
Show comments