नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर शहरात सर्वत्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फलक लावण्यात आले असून त्यात मोठ्या प्रमाणात एकनथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याही फलकांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पुत्राचे ‘ब्रॅण्डिंग’ केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विमानतळापासून तर विधानभवनापर्यंत जाणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह भाजप नेत्यांचेही मोठे फलक, कटाऊट्स लावण्यात आले आहेत. वर्धा मार्गावरील उड्डाण पुलावरील रस्ता दुभाजक तर एकनाथ शिंदे, फडणवीस, मोदी, यांच्या उभ्या फलकांनी झाकोळून गेला आहे. विशेष म्हणजे याच फलकासोबत मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांचेही फलक लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, श्रीकांत शिंदे यांचे या भागात विशेष प्रस्थ नाही. पण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकांवर अग्रभागी त्यांच्या छायाचित्राला स्थान दिले आहे. मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बंगल्यापुढे एकनाथ शिंदेंसोबतच श्रीकांत यांचेही फलक लावण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला याच गोष्टीची चर्चा होती. दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फलक शहरात अनेक ठिकाणी लागले आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे.

हेही वाचा: आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन; सीमावादासह ‘या’ मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता

महामेट्रो कारवाई करणार?

मेट्रो मार्गिकेच्या खांबावर जाहिराती किंवा राजकीय फलक लावण्यास महामेट्रोने यापूर्वीच मनाई केली आहे. अनेकदा असे करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्राही नोंदवण्यात आली आहे. मात्र, अधिवेशनाच्या निमित्ताने वर्धा मार्गावरील महामेट्रोच्या फुलावर ठिकठिकाणी भगवे झेंडे व राजकीय नेत्यांचे फलक लावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेत्यांचे फलक त्यात असल्याने महामेट्रो कोणावर कारवाई करणार असा सवाल विरोधी पक्षाने केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात शिंदे गटाची छाप

नागपूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असले तरी अधिवेशनाच्या निमित्ताने लावलेल्या फलकांमध्ये शिंदे गटाची छाप दिसून येत आहे. ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि मुख्यमंत्र्यांचे फलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, नागपुरात शिंदे गटाचा एकही आमदार व खासदार नाही हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा: विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; सीमाप्रश्न, वादग्रस्त वक्तव्यावरून सरकारला घेरण्याचा निर्धार

“अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फलक प्रत्येक सिग्नलवर लावले आहे. त्यामुळे वाहनधारकांना सिग्नल दिसत नाही,महापालिका कारवाई का करत नाही याचे आश्चर्य वाटते.” – संदेश सिंगलकर, काँग्रेस नेते.

Story img Loader