नागपूर : आठ वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर महिलेने कठीण स्थितीत मुलाचा सांभाळ केला. मुलाला बारावीत ९० टक्के गुण मिळाले. त्याला एनडीएत प्रवेश घेऊन सैन्यात सेवा द्यायची इच्छा होती. परंतु अपघातात मेंदूमृत झाल्याचे पुढे झाले. अखेर पुत्रवियोगातही मातेने मुलाचे अवयवदान केले. अवयवांच्या यशस्वी प्रत्यारोपणातून सात जणांना नवीजीवन मिळणार आहे.
हेमांशीष ऊर्फ आर्यन (१८) रा. खापरखेडा असे मृत मुलाचे नाव आहे. हेमांशीषच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. परंतु रिता यांनी एका खासगी संगणक केंद्रात नोकरी पत्करली. हेमांशीष हुशार होता. त्याला बारावीत ९० टक्के गुण मिळाले. एनडीएमध्ये प्रवेश घेऊन सैन्यात सेवा देण्याची त्याची इच्छा होती. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी तो कॅटरिंगच्या कामावर जात होता. १९ मे रोजी तो मित्रांसह दुचाकीवर फिरायला गेला. त्याने हेल्मेट घातले नव्हते. अचानक गाडी स्लिप झाल्याने तो रस्त्यावर आपटला. मेंदूला गंभीर इजा झाली. त्याला एलेक्सिस रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. ही कल्पना विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव राहुल सक्सेना, समन्वयक विना वाठोडे यांनी मुलाच्या आईसह त्याच्या काकांना दिली. मुलाच्या अवयवदानातून अनेकांना जीवदान शक्य असल्याचे कळल्यावर आईने मनावर दगड ठेवून अवयवदानाला होकार दर्शवला. मुलाचे हृदय चेन्नईतील एका रुग्णात, दोन्ही फुफ्फुस चेन्नईतील एका रुग्णात, यकृत एलेक्सिस रुग्णालयातील रुग्णात, मूत्रपिंड एलेक्सिस आणि वोक्हार्ट रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. बुब्बुळ माधव नेत्रपेढीला दिले गेले.