महेश बोकडे

कर्करुग्णांना फटका

मध्य भारतातील  कर्करुग्णांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र असलेल्या मेडिकलच्या कर्करोग विभागातील  ब्रेकी थेरपी उपकरण  डिसेंबरपासून बंद आहे. या उपकरणावर अन्ननलिका, गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या रुग्णावर उपचार केले जातात हे येथे उल्लेखनीय.

मेडिकलमध्ये सध्या पाच हजारांहून अधिक  कर्करुग्णांची नोंद आहे. ते नियमितपणे उपचारासाठी  येथे येतात. यासोबत येथे प्रत्येक वर्षी दोन ते अडीच हजार नवीन कर्करुग्णांची भर पडते. त्यातील अनेकांना कोबाल्ट आणि ब्रेकी थेरपी या उपकरणांवर  उपचाराचा भाग म्हणून ‘लाईट’ घ्यावे लागते. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत या उपकरणाची क्षमता कमी असल्यामुळे अनेकांना प्रतीक्षा करावी लागते. मेडिकलचे दोन्ही उपकरण १२ ते १४ वर्षे जुने झाल्यामुळे ते कालबाह्य़ झाले आहे, परंतु  नवीन उपकरण देत नसल्याने जुन्या उपकरणांवरच काम सुरू होते. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे  ब्रेकी थेरपी  यंत्र बंद पडले असून ते पुन्हा सुरू होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे येथील अन्ननलिका, गर्भाशयासह इतर काही गटातील कर्करुग्णांना पहिल्या २५ लाईट कोबाल्ट यंत्रावर घेतल्यावर शेवटच्या तीन ते चार लाईट ब्रेकी थेरपी यंत्रावर घेता येत नाही.

दरम्यान, मेडिकलच्या कर्करोग विभागाला २००५ मध्ये केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाने कोबाल्ट यंत्रासाठी चार कोटी रुपये दिले होते. त्यानंतर येथे  ब्रेकी थेरपी यंत्र आले. दोन्ही यंत्र कालबाह्य़ झाल्याचे बघत मेडिकल प्रशासनाने बऱ्याचदा शासनाला या विभागासाठी लिनियर एक्सिलेटर यंत्र घेण्याचा प्रस्ताव दिला, परंतु तो अनेक वर्षांपासून मंत्रालयात धूळखात आहे.

प्रस्तावाकडे दुर्लक्ष

ब्रेकी थेरपी यंत्रावरील ‘सोर्स’ संपत असल्याने  पुढील व्यवस्था करण्याबाबत मेडिकलने शासनाकडे प्रस्ताव पाठवला  होता, परंतु वैद्यकीय शिक्षण खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत रोज १ ते २ रुग्णांना या यंत्रावर लाईट देऊन वेळ काढण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला.  या यंत्रावर रोज सुमारे १० रुग्णांना लाईट देण्याची क्षमता आहे.

कर्करुग्णांना कोबाल्ट यंत्राच्या  माध्यमातून उपचार केला जात आहे. न्यूझीलंडवरून लवकरच ‘सोर्स’ उपलब्ध झाल्यावर ब्रेकी थेरपी यंत्र सुरू होईल. दरम्यान, शासनाने कर्करुग्णांसाठी नवीन उपकरणांच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू केली असून ते आल्यावर रुग्णांना अद्ययावत उपचार मिळेल.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

Story img Loader