अमरावती : आमदार रवी राणा यांच्या बंगल्याच्या बांधकामासाठी वीटभट्टी व्यावसायिकांनी मोफत ७० हजार विटा पुरविल्या, तरीही राणा यांच्या आदेशावरून महसूल प्रशासनाने वीटभट्टयांवर बुलडोझर फिरवून कारवाई केली, असा आरोप कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्टी व्यावसायिकांनी केला आहे. दुसरीकडे, प्रदूषण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने महिनाभरापुर्वीच कारवाईची नोटीस दिली होती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.बडनेरा नजीक कोंडेश्वर मार्गावर सुमारे ७५ वीटभट्टया असून बहुतांश वीटभट्टया या सरकारी जमिनीवर आहेत. येथून जवळच आलीयाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर झाली आहे. हे महाविद्यालय उभारण्यासाठी ही जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने बुधवारी दुपारी या परिसरातील वीटभट्टया उध्वस्त करण्याची कारवाई सुरू केली.
रस्त्याला लागून असणाऱ्या सुधाकर खोब्रागडे यांची वीटभट्टी जेसीबीच्या सहाय्याने सर्वात आधी उध्वस्त करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना वीटभट्टी चालकांनी विरोध दर्शविला. यावेळी एका वीटभट्टी चालकाने एका महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर हात उगारल्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कारवाई थांबविण्यास सांगितले. येत्या २० मे पर्यंत या वीटभट्ट्या या शासकीय जागेवरून हटवाव्या, अशी अखेरची सूट त्यांना देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वडेट्टीवार म्हणतात, ‘शरद पवार मूळचे गांधी विचारांचे’; सत्ता परिवर्तन होणार
वीटभट्ट्यांवर मेळघाटातील एक हजाराच्यावर आदिवासी मजूर कामावर आहेत. आज वीटभट्टी परिसरात असणाऱ्या मजुरांच्या झोपड्या कारवाईदरम्यान उध्वस्त करण्यात आल्या. यामुळे अनेक आदिवासींचे कुटुंब उघड्यावर आलेत. या कारवाईमुळे या मजुरांच्या घरात आज अन्न देखील शिजले नाही. या भागात अनेक वर्षांपासून असणाऱ्या आमच्या वीटभट्ट्या या ठिकाणी सुरक्षित राहतील, असे आश्वासन आमदार रवी राणा यांनी आम्हाला दिले होते. या परिसरालगतच त्यांचा बंगला बांधण्यासाठी त्यांनी आम्हाला दोन लाख विटा द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यावेळी सर्व वीटभट्टी चालकांनी त्यांना ७० हजार विटा मोफत पुरवल्या होत्या. माझ्या वीटभट्टी वरून मी ४ हजार विटा आमदार रवी राणा यांना दिल्या, असे सुधाकर खोब्रागडे या वीटभट्टी चालकाने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
हेही वाचा >>> बायकोने दिली थंड भाजी, नवऱ्याने घेतला आत्महत्येचा निर्णय; पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवऱ्याचे वाचले प्राण
आरोप चुकीचे : रवी राणा
वीटभट्टी व्यावसायिकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. आपण त्यांना एकही वीट मागितली नाही. त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. राजकीय हेतूने हे आरोप करण्यात येत आहेत. महत्प्रयासाने अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. त्यासाठी ही जागा हवी आहे. हीच आपली प्राथमिकता आहे. वीटभट्ट्या पर्यायी जागेत स्थलांतरीत व्हायला हव्यात. –रवी राणा, आमदार, बडनेरा.