घरात लग्नकार्याची धावपळ सुरू होती. सर्वांची लाडाची लेक बोहल्यावर चढणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. सनई-चौघड्याचे सूर सर्वत्र निनादत होते. सर्वांना प्रतीक्षा असलेली लग्नघटिका जवळ आली, नववधू-वर बोहल्यावर चढले आणि त्याच दिवशी वधूच्या पाठवणी प्रसंगी आईने अखेरचा श्वास घेतला. मंजूषा आदिनाथ चौधरी (४२) असे मृत मातेचे नाव आहे. महागाव तालुक्यातील शिरपुल्ली या गावात घडलेल्या या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस साहेब…आम्ही पाकिस्तानात हनुमान चालिसा पठण करायचे काय? नागपुरात संतप्त आंदोलकांचा सवाल
शिरपुल्ली येथील आदिनाथ व मंजूषा चौधरी यांची थोरली कन्या पूजा हिचा विवाह सेलू येथील प्रेम ठाकरे या तरुणासोबत जुळला. दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घरातील पहिलेच लग्नकार्य असल्याने मंजूषा व आदिनाथ चौधरी यांनी लेकीच्या लग्नात कुठलीही कसर सोडली नाही. पुसद येथे १० फेब्रुवारीला एका मंगल कार्यालयात पूजा आणि प्रेम यांचा विवाह पार पडला. त्यांचा मंगलविधी सुरू असतानाच पूजाची आई मंजूषा यांची प्रकृती अचानक बिघडली. मंगल कार्यालयात, वऱ्हाडी मंडळींची धावपळ नको म्हणून काही नातेवाईक त्यांना पुसद येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले. मंगल कार्यालयात सर्व विधी सुरळीत सुरू झाले. तर दवाखान्यात डॉक्टरांनी मंजूषा यांच्यावर उपचारांसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. लेकीच्या लग्नात आपण दवाखान्यात असल्याची खंत बोलून दाखवत मंजूषा यांनी लग्नात उपस्थित राहण्याचा आग्रह धरला.
हेही वाचा >>> शेगावात लाखावर भाविकांची मांदियाळी; अकराशे दिंड्याही दाखल; माध्यान्ही दर्शनाला लागताहेत पाच तास
प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना व्हिडीओ कॉलवरच लग्नविधी दाखवले. मंजूषा यांची प्रकृती काही दिवसांपासून बरी नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र, लग्नाच्या धावपळीमुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगण्यात येते. मुलगी बोहल्यावर चढल्यानंतर सायंकाळी मंगल कार्यालयात तिच्या पाठवणीची लगबग सुरू असताना, दवाखान्यात डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. मात्र यावेळी डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि तिकडे वधू माहेरचा निरोप घेत असताना तिच्या आईने दवाखान्यात जगाचा निरोप घेतला. आईच्या मृत्यूची बातमी लग्न मंडपात येताच नववधूसह सर्व वऱ्हाडी, नातेवाईक शोकसागरात बुडाले. त्याच दिवशी रात्री शिरपुल्ली गावात मंजूषा चौधरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंजूषा चौधरी यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे. लेकीच्या लग्नाच्या मांडवातून आईची अंत्ययात्रा निघाली. चौधरी परिवारातील आनंदाच्या क्षणांत कोसळलेल्या या दु:खद प्रसंगाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.