अकोला : अकोला-अकोट मार्गावर पूर्णा नदीवर असलेल्या गांधीग्राम येथील ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेले आहेत. वरच्या बाजूने पूल खाली दबल्याचे मंगळवारी सकाळी लक्षात आले. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पुलाला बांधून ९५ वर्षे झाली आहेत. इ.स. १९ जुलै १९२७ रोजी या पुलाचे उद्घाटन ब्रिटिश अधिकाऱ्याने केले होते. या पुलाची उंची ३५ फूट व रुंदी २० फूट आहे. लांबी २५५ फूट असून या पुलाला आठ गाळे आहेत. नदीच्या काठावर दोन्ही बाजूला पुलाच्या सुरक्षेसाठी कवच (पिचिंग) बसवलेले आहे. पूल मजबूत होण्यासाठी नदीवर खोलवर सिमेंट, लोखंडाचा वापर करून बांधलेला आहे. शतकाकडे वाटचाल करणारा पूल आता क्षतिग्रस्त झाला. पुलाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
हेही वाचा >>> नागपूर : अनेकांना गंडवणारा अजित पारसे आहे कोण ?
आज सकाळी पुलाला खालच्या बाजूने मधोमध मोठी किर पडल्याचे समोर आले. वरच्या बाजूने पुलावरील रस्ता खाली दबला आहे. पुलाला तडे गेल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक ही इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. गांधीग्राम पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूकदारांनी इतर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन दहिहांडाचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी केले.
पूर्णा नदीवर गांधीग्राम ऐवजी नवीन पुलाचे काम दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपालखेड येथे सुरू आहे. रस्त्याचे काम अजून झाले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय संथ गतीने पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नवीन पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल देशातील पहिला सिमेंटचा पूल आहे. अकोला-अकोट मार्गावर अतिशय वर्दळ राहते. पूर्णा नदीला आलेले शेकडो पुराचे पाणी आतापर्यंत पुलावरून गेले. गांधीग्राम पुलाला अनेकवेळा तडे गेल्याचे निदर्शनात आले. या पुलाच्या डागडूजीचे काम करून त्यावरून धोकादायक वाहतूक सुरू होती. आता पुन्हा तडे गेल्याचे लक्षात येताच वाहतूक बंद करण्यात आली आहे.