लोकसत्ता टीम
नागपूर : सरकारी कार्यालयातील अस्वच्छता हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो, कार्यालयच सोडा परिसरातही स्वच्छता केवळ स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिनानिमित्तच बघायला मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दालने सोडली तर इतर ठिकाणी स्वच्छता नावालाच. त्यांच्या स्वच्छता गृहाला नेहमीच कुलूप लागलेले दिसेल, तेथे येणाऱ्यांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहात नाकाला रुमाल लावल्याशिवाय उभे राहता येत नाही. हे चित्र नेहमीच. त्याचे कोणालाच देणेघेणे नसते. रविवार असूनही नागपूरच्या सरकारी कार्यालयात वेगळे चित्र दिसून आले. अधिकारी हाती झाडू घेऊन होते तर महिला कर्मचाऱ्यांच्या हाती पोच्छा होता.
निमित्त होते. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल पंधरावड्याचे. यानिमित्त ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ मोहीम हाती घेण्यात आली. सरकारी आदेश मग, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हात स्वच्छतेसाठी सरसावले. खुद्द जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यात सहभागी झाले. रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.या उपक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री पीयुष चिवंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, दीपमाला चवरे, संजय गिरी, मयुर ठेकेदार, रोहित ठाकरे, चंद्रकांत दुधपचारे व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
आणखी वाचा-धक्कादायक : खाटेची कावड करून गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवले; पण बाळ दगावले
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये येथेही हा उपमक्रम राबविण्यात आला. शासनाने घोषित केलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजना या पंधरवड्यात जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा विविध योजनांची माहिती नेतेपर्यंत पोहोचविली जाणार आहे. पुढील कालावधीत म्हणजेच ५ ऑगस्टला ‘कृषी मार्गदर्शन कार्यक्रम’ होणार असून ६ ऑगस्टला ‘शेती, पाऊस आणि दाखले’ याबाबत सादरीकरण होणार आहे.
७ ऑगस्टला ‘युवा संवाद कार्यक्रम’ होणार असून ८ ऑगस्टला ‘महसूल – जनसंवाद कार्यक्रम’ तर ९ ऑगस्टला ‘महसूल ई-प्रणाली कार्यक्रम’ होणार आहे. १० ऑगस्टला जिल्हा सैनिक कल्याण विभागाचा ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. ११ ऑगस्टला ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे’ आयोजन होणार आहे. १२ ला समाज कल्याण विभागाचा ‘एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा’ कार्यक्रम, १३ ला महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘संवाद व प्रशिक्षण’, १४ ला ‘महसूल पंधरवाडा वार्तालाप’ कार्यक्रम होईल. १५ ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद मध्ये ‘उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह’ची सांगता होणार आहे.