चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन तिकीट घोटाळ्यातील मुख्य आरोपी अभिषेक विनोद ठाकूर व रोहित विनोद ठाकूर या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन तिकीट बुकींगचे काम चंद्रपूर वाईल्डलाईफ कनेक्टीविटी सोल्युशन या अभिषेक व रोहित ठाकूर बंधुंच्या कंपनीकडे होते. या दोघांनी मिळून ऑनलाईन तिकीट विक्रीत १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांचा गैरव्यवहार केला. ताडोबा व्यवस्थापनाच्या लक्षात हा गैरव्यवहार येताच ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा…साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई
त्यानंतर ठाकूर बंधू फरार झाले होते. स्थानिक न्यायालयाने ठाकूर बंधूंना काही रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी काही रक्कम जमाही केली. मात्र, या घोटाळ्याची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याने उच्च न्यायालयाने दोघांचा जामीन रद्द केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन रद्द केला. दोन दिवसांपूर्वी दोघांनाही अटक करण्यात आली.