वाशीम : बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांचा १८ फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी ‘बसप’च्या वतीने आज ९ मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांचे अपहरण करून खून झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात न घेता १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एकत्र येऊन रोष व्यक्त केला होता. बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांनी यापूर्वी जउळका रेल्वे पोलीस ठाण्यात जिवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने कांबळे यांचा खून झाल्याचा रोष व्यक्त करून या प्रकरणात पोलीस अधिकारी मोरे आणि गोरे यांच्यावर कारवाई करावी या व इतर मागण्यासाठी आज ९ मार्च रोजी बसपाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
हेही वाचा – बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी चार शिक्षक निलंबित; शिक्षण विभागाची कारवाई
यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने, अविनाश वानखेडे व इतर नेत्यांनी विश्वास कांबळे यांना न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दोषी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.