नागपूर : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) मतांमध्ये निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे २०२४ मधील निवडणुकीत बसपची कामगिरी कशी राहणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षांपूर्वी बसपची सत्ता होती. त्यानंतर नागपूरसह महाराष्ट्रात हा पक्ष मजबूत होऊ लागला. परिणामी, बसपच्या मतदानाचा टक्काही वाढला. नागपूर महापालिकेतही बसपचे नगरसेवक निवडून आले. काही लोकसभा निवडणुकीत बसपच्या उमेदवारांनी चांगली मतेही मिळवली. मात्र गेल्या दोन निवडणुकीत हे चित्र बदलले. नागपूर- रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात बसपच्या मतांमध्ये निम्मी घट झाली.
हेही वाचा – नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
हेही वाचा – विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
नागपूर लोकसभेचा विचार केल्यास २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपच्या मतांमध्ये चांगली वाढ झाली. माणिकराव वैद्य यांनी बसपकडून १ लाख १८ हजार ७४१ मते मिळवली होती. मात्र त्यांनतर मतांची संख्या घटत गेली. गेल्या निवडणुकीत मतांमध्ये मोठी घट झाली. रामटेकमध्येही अशीच स्थिती आहे. २००४, २००९ च्या निवडणुकींमध्ये बसपच्या मतांमध्ये चांगली वाढ झाली. मात्र २०१४ मध्ये किरण पाटणकर यांना ९५ हजार ५१ मते मिळाली.
आकडे काय सांगतात?
रामटेक लोकसभा
वर्ष – उमेदवार – मते
२०१९ – सुभाष गजभिये – ४४,३२७
२०१४ – किरण पाटणकर – ९५,०५१
२००९ – प्रकाश टेंभूर्णे – ६२,२३८
२००४ – चंदनसिंह रोटेले – ५५,४४२
नागपूर लोकसभा
वर्ष – उमेदवार – मते
२०१९ – माेहंमद जमाल – ३१,७२५
२०१४ – मोहन गायकवाड – ९६,४३३
२००९ – माणिकराव वैद्य – १,१८,७४१
२००४ – जयंत दळवी – ५७,०२७