चंद्रपूर : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत आयुक्त तथा प्रशासक विपीन पालिवाल यांनी २०२४-२५ चा सुधारित आणि २०२५-२६ चा वार्षिक अर्थसंकल्प प्रशासक समितीच्या मान्यतेसाठी सादर केला. गेल्यावर्षी ६१४.५८ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक होते, यावर्षीचे अंदाजपत्रक हे ६८७.१८ कोटीचे आहे. यामुळे महापालिका आता अमृत अभियान-२ साठी ८५.७९१ कोटी आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १६२.६१ कोटींचा वाटा कसा उभारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावर्षीचे अंदाजपत्रक हे तुटीचे आहे. यामुळे या वर्षात महसुली उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे. २०२४-२५ च्या सुधारित अर्थसंकल्पात महापालिकेच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतापासून ५०.२४ कोटी रुपये अपेक्षित आहे. मात्र, नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत केवळ २४.१० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुढील चार महिन्यांत २६.१४ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. मालमत्ता करापासून थकबाकीसह ३६.७१ कोटी रुपये अपेक्षित होते. यावर्षी हे उत्पन्न ३५ कोटी एवढे ठेवण्यात आले आहे. कर्मचारी मानधन खर्च ३३ कोटी ९० लाख एवढा निर्धारित करण्यात आला आहे. अमृत अभियान-२ मध्ये महापालिकेला ३० टक्के म्हणजेच ८५.७९१ कोटी वाटा उचलावा लागणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या अंदाजपत्रकात ७० कोटींचा समावेश करण्यात आला आहे. मलनिस्सारण प्रकल्प पहिला टप्पा यात १६२.६१ कोटी रुपयांचा वाटा उचलावा लागणार असल्याने २० कोटींचा समावेश आहे. रामाळा तलाव पुनरुज्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी लागणारे ९ कोटी खनिज विकास निधीतून प्राप्त होणार आहे. ऊर्जेद्वारा २५० किलोवॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले असून १ हजार किलोवॉट वाढीचे नियोजन आहे. त्यामुळे वीजबिलावर होणाऱ्या सुमारे १२ कोटी रुपये खर्चाच्या ६० टक्के बचतीचे उद्दिष्ट आहे.

Story img Loader