अकोला : अकोट-खंडवा रेल्वेच्या ब्रॉडगेज कामाला निधीचे बळ मिळणार आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मेळघाटचा अडथळा आल्याने वळणमार्गे २९ किमीचे अंतर वाढेल. सध्या या मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा १४५० कि.मी.चा लांबीचा काचीगुडा-जयपूर हा रेल्वेमार्ग १९५६-५७ पासून अस्तित्वात होता. अत्यंत महत्त्वाच्या या मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काचीगुडा ते पूर्णा व जयपूर ते रतलाम या मार्गाचे ब्रॉडगेज करण्यात आले. २०१० मध्ये अकोला ते पूर्णा हा रेल्वे मार्गही ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाला. दरम्यान, २००८ मध्ये अकोला-खंडवा-रतलाम या मार्गाच्या ब्रॉडगेजलाही हिरवी झेंडी मिळाली. या मार्गामधील प्रमुख टप्पा अकोट-आमला खुर्ददरम्यान ७८ कि.मी. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्राचा मुख्य अडथळा होता. वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याचे कारण पुढे करून वन्यजीवप्रेमींनी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला विरोध केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या संरक्षित क्षेत्रातून ३८.२० कि.मी.चा मार्ग जातो. त्यात अतिसंरक्षित क्षेत्र १७ कि.मी.च्या आसपास असल्याने रेल्वेने ब्रॉडगेजचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर केला होता.

हेही वाचा >>>अकोल्यासह मध्य प्रदेशातील ११ ठिकाणी ईडीची छापेमारी, ‘नारायण’ कंपनीकडून तीन बँकांची १०९.८७ कोटींची फसवणूक

या मार्गाला परवानगी मिळाली नाही. केंद्र सरकारने रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने करण्यास मंजुरी दिली. मेळघाट प्रकल्पाच्या बाहेरून तुकईथडवरून खिकरी, खकनार, उसरनी, जामोद, सोनाला, हिवरखेड मार्गे अडगावला पोहोचणार आहे. मीटरगेज असताना अकोला ते खंडवा हे अंतर १७४ किलोमीटर होते. आता प्रस्तावित ब्रॉडगेज मार्ग व्याघ्र प्रकल्पाबाहेरून २९ किलोमीटरचा वळसा घेऊन जाणार असल्याने हे अंतर आता २०३ किलोमीटर होणार आहे. सध्या या मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे.

दरम्यान, रतलाम-महू-खंडवा-अकोला रेल्वेमार्गाच्या कामासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्पात ६१० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. रतलाम-महू-खंडवा-अकोला ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी केंद्राकडून मिळणारा निधी महू ते खंडवा व खंडवा ते अकोला या दोन टप्प्यांवर समान खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या कामाला गती येणार आहे.

अकोला-पूर्णाच्या दुहेरीकरणासाठी निधी

रेल्वेच्या अकोला-पूर्णा-मुरखेड-ढोण मार्गाच्या दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पात २१९ कोटी ९९ लाख ९८ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे हे काम देखील वेगाने होण्याची चिन्हे आहेत.

अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. यामध्ये अकोट-खंडवा, अकोला-ढोण आदींसह एकूण २० प्रकल्पाचा समावेश आहे.स्वानंद कोंडोलीकरण, सदस्य, झेडआरयूसीसी, मध्य रेल्वे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget provision for broad gauge work of akot khandwa railway akola ppd 88 amy
Show comments