समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ४ नोव्हेंबर ) समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. , फडणवीसांनी चालवलेली गाडी बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरजा यांची आहे. त्यामुळे कोण आहेत कुकरेजा आणि त्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षशी काय संबध हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
हेही वाचा >>> व्हीव्हीआयपींच्या पाहणी दौ-याच्या दिवशीच अजगराकडूनही समृध्दीची ‘पाहणी’
विक्की कुकरजा हे शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आहेत. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. २०१७ मध्ये ते प्रथम भाजपकडून जरीपटका भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याशी असलेली घनिष्ठ मैत्री यामुळे कुकरेजा यांना महापालिकेत अल्पकाळातच अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे. २०१४ ते २०१९ या काळात बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी घेतलेली झेप अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. मिहान मध्ये एम्स रूग्णालयापुढील प्रचंड मोठे निवासी व व्यावसायिक संकुल असो की सिव्हील लाईन्समधील प्रकल्प. नुकतीच त्यांनी सिव्हील लाईन्समधील अतिशय मोक्याच्या ठिकाणची एअर इंडियाच्या कार्यालयाची जागा त्यांनी लिलावात नुकतीच घेतली. असे अनेक प्रकल्प कुकरेजा समुहातील कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत.
हेही वाचा >>> पंतप्रधानाच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलले; समृध्दीसह अनेक अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार
एक यशस्वी उद्योजक, राजकारणी अशी ओळख कुकरेजा यांची असली तरी अनेक घटनांमध्ये त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने ते चर्चेत आले होते. यात महिलांना मारहाणीचा, उत्तर नागपुरातील उद्यानासाठी राखीव जागा हडपन्याच्या आरोपांचा यात समावेश आहे. रविवारी उपमुख्यमंत्र्यांनी जी गाडी चालवली ती कुकरेजा इन्फास्टृक्चर या कंपनीच्या नावावर नोंदवली असूनही ही कंपनी विक्की कुकरेजा यांची आहे.