नागपूर : लग्नाचा सिझन म्हणजे घरी कुणा ना कुणाकडील लग्नपत्रिका येऊन पडलेल्या. हल्ली तर या लग्नपत्रिकांचा आकारही मोठा. लग्नसोहळा आटोपल्यावर त्यांचे करायचे काय? एकतर ते अग्नीच्या स्वाधीन करायचे, नाही तर फेकून द्यायचे. त्याचाही योग्य उपयोग होऊ शकतो, कुणाला तरी त्यातून निवारा मिळू शकतो हे तुमच्या-आमच्या गाठीही नसेल, पण सेवानिवृत्त ७२ वर्षीय अशोक तेवानी यांनी ते करून दाखवलंय. या लग्नपत्रिकांपासून गेल्या १२ वर्षांत त्यांनी तब्बल २१०० घरटी तयार केली आणि त्यात आता वेगवेगळ्या पक्ष्यांनी त्यांचा संसार थाटलाय.
आपणही या समाजाचे काही तरी देणं लागतो, ही भावना जोपर्यंत मनात जागृत होत नाही, तोपर्यंत समाज उपयोगी काम तुमच्या हातून घडणार नाही. म्हणूनच त्यांनी चिमणी पाखरांसाठीचं घरकुल तयार करण्याचे काम सुरू केले. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर अशोक तेवानी यांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन आधीच तयार केला होता. त्यानुसार ते दिवसभरातील पाच ते सात तास काम करून रोज एक ते दोन घरटे तयार करतात.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा दौरा रद्द, वादाची बाब कुलगुरूंनी फेटाळली
४० रुपयांमध्ये तयार होतं चिमणीचे घरटे
अशोक तेवानी गेल्या १२ वर्षांपासून चिमणी पाखरांची घरटे तयार करत आहेत. सुरुवातीला बरेच वर्षे त्यांनी हे घरटे निशुल्क वितरित केले. मात्र, फुकट मिळालेल्या वस्तूंची लोकांना किंमत नसते याबाबतीतील काही अनुभव त्यांना आले. त्यामुळे घरटे तयार करण्यासाठी लागणारी साहित्याची किंमत म्हणून ४० रुपये घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – काय सांगता! लायसन्स बनवायला आरटीओत गेला अन् कार गमावून बसला…
यातून मला ऊर्जा मिळते
आतापर्यंत सुमारे २१०० घरटे त्यांनी लोकांना वितरित केले आहेत. त्या घरट्यात ज्यावेळी चिमणी राहायला येते, अंडी देते, किंवा लहान पाखरांचा जन्म होतो. ते व्हिडीओ लोक मला आवर्जून पाठवतात. ते बघून मला यापेक्षा आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते, असं अशोक तेवानी सांगतात.