बुलढाणा: बुलडाणा शहरातील आर्थिक फसवणूक झालेला युवा शेतकरी तथा ‘केबल ऑपरेटर’ असलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज मंगळवारी, २३ जुलै रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली आहे. नीलेश दत्तात्रय डुकरे असे मृत युवकाचे नाव आहे. बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या सागवन परिसरातील समता नगर येथील तो राहिवासी होता. शेतीला जोडधंदा म्हणून तो ‘केबल ऑपरेटर’चे काम देखील करीत होता.

नीलेश दत्तात्रय डुकरे याने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती पहिल्यापासून गंभीरच होती. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील त्याच्या नातेवाईकांना याची पूर्व कल्पना दिली होती.

हेही वाचा – दुचाकी- कारच्या पेट्रोलच्या टाकीतून पाणी निघतेय? तर इंजिनला धोका

नीलेशने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून त्यात आपल्या सोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीचा तपशील लिहून ठेवला. यात आर्थिक फसवणूक आणि त्यापायी झालेला ‘बाहेरचा त्रास’ याची माहिती लिहिली होती. सोबत राहणाऱ्या दोघांनी नीलेश डुकरे याच्या नावाने मोठी रक्कम उचलली. त्यांनी मला गुंतविल्याचे ‘तिसऱ्याला’ देखील माहीत आहे. त्याचाही फसवणुकीत सहभाग असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे. यामुळे मी कर्जबाजारी झाल्याचे नमूद आहे. माझ्या आत्महत्येसाठी हे तिघेजण जबाबदार असल्याचे नमूद आहे. त्या तिघांकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी करून त्यांच्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. यामध्ये आपल्या घरच्यांची (परिवाराची) काहीच चूक नसल्याचे ‘सुसाईड नोट’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. चिठ्ठीमध्ये तिघांची नावे लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी बुलढाणा शहर पोलिसांच्या हाती लागली. मात्र आरोपींना याची कुणकुण लागू नये आणि ‘ते तिघे’ फरार होऊ नये म्हणून पोलिसांनी नावे जाहीर केली नाही.

हेही वाचा – VIDEO : जेव्हा वाघाला पोटाची समस्या उद्भवते, तेव्हा…

दरम्यान दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली नीलेश डुकरे यांची झुंज आज २३ ला संपली. आता ‘सुसाईड नोट’ मध्ये नाव असलेल्या तिघांना तातडीने अटक करण्याचे आव्हान बुलढाणा शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दुसरीकडे या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने बुलढाणा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डुकरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समता नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही लाेकांवर विश्वास ठेवून नीलेशने त्यांना गुंतवणुकीत मदत केली. परंतु, त्यांनी नीलेशला दगा दिला.