प्रशांत देशमुख, प्रतिनिधी, वर्धा

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी होते. त्यातलीच एक होती प्रणिता पौनिकर यांची कन्या अवंतिका. नोकरीच्या निमित्ताने अवंतिका पुण्याला चालली होती. मात्र आता तिचं काय झालं असेल? या काळजीनेच प्रणिता पौनिकर यांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. तसंच मला तिथे घेऊन चला असा आर्त टाहो त्यांनी फोडला आहे.

नेमकी काय घडली घटना?

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे नागपूर बसला अपघात झाल्याच्या बातम्या माध्यमांवर आल्या. या घटनेत २५ प्रवासी होरपळून ठार झाल्याचीही बातमी समोर आली. त्यानंतर वर्धा या ठिकाणी राहणाऱ्या प्रणिता पौनिकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या अपघातात आपली लाडकी मुलगी अवंतिका सापडली आहे याचं त्यांना अतीव दुःख झालं आहे. बस अपघातात आपली लाडकी मुलगी सापडल्याचे कळताच प्रणिता पौनिकर कोसळून पडल्या.अद्याप त्यांना खरे काय ते सांगण्यात आले नाही.म्हणून मला मुलीला पाहायचे असल्याचा टाहो त्या फोडत असल्याचे त्यांच्या मैत्रीण श्रीमती मानमोडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनला सांगितले.

अवंतिका पौनिकर पुण्याला का चालली होती?

प्रणिता यांची कन्या अवंतिका हे पुण्यात नोकरीच्या निमित्ताने चालली होती.तिने एक मॉडेल म्हणून बऱ्यापैकी नाव कमविले होते.तिची बहीण मोनु ही पण पुण्यात नोकरी करते. ती तिथून निघाली आहे. पतीच्या आकस्मिक मृत्यू नंतर आपल्या मुलींचा सांभाळ श्रीमती पौनिकर यांनीच केला. त्यासाठी त्या काही काळ न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये नोकरी करत होत्या.सध्या त्या मेघे विद्यापीठात कार्यरत आहेत.आईची प्रकृती बरी नसते म्हणून अवंतिका विदेशात गेली नव्हती. आता या आठवणीने त्या व्याकूळ झाल्या आहेत.त्यांना धीर देण्यासाठी काही स्नेही घरी पोहचले आहेत. मात्र हे स्नेहीही अश्रू आवरत बाहेर घराबाहेर थांबले आहेत.कारण मुलीची नेमकी स्थिती काय, याबाबत सर्वच अनभिज्ञ असून प्रशासन थेट काय सांगायला तयार नाही अशी स्थिती आहे.

पोलिसांनी या अपघाताविषयी काय सांगितलं?

साधारण रात्री दीडच्या सुमारास या बसचा अपघात झाला. या बसमध्ये ३२ प्रवासी होते. २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. इतर प्रवासी वाचले आहेत. बस उलटल्यानंतर या बसने पेट घेतला. डीझेल टँक फुटून आग लागली आणि वाढली त्यामुळे बसमधले प्रवासी होरपळले. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले असंही पोलिसांनी सांगितलं. बसच्या केबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. एकजण झोपला होता तर दुसरा गाडी चालवत होता. एक चालक बचावला असून दुसऱ्याचा मृत्यू झाला अशीही माहिती पोलिसांनी दिली

Story img Loader