बुलढाणा : विदर्भाच्या टोकावरील आणि राजकीय दृष्ट्या उपेक्षित, विकासाच्या दृष्टीने दीर्घकाळ मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्याला आजवरच्या दीर्घ काळात लाल दिव्याची अर्थात मंत्रिपदाची मोजकीच संधी मिळाली. मंत्रिपदाच्या या मोजक्या आणि दिग्गज नेत्यांच्या यादीत आता आकाश फुंडकर यांचा समावेश झाला आहे.

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्यात दीर्घ काळ काँग्रेसचे निर्विवाद राजकीय वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत राज्यात काँग्रेसची सत्ता आणि ओघानेच सरकार राहिले. सन १९९५ मध्ये राज्यात प्रथमच भाजप शिवसेना युतीच्या रुपाने पहिले गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आले. त्यानंतर काँग्रेसचे वर्चस्व कमी होत २०१४ मध्ये पुन्हा युतीचे सरकार सत्तेत आले. यानंतर पुलाखालून बंडखोरीचे बरेच पाणी वाहून गेले आहे. यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे.

हेही वाचा – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन

आजवरचा दीर्घ राजकीय कालखंड लक्षात घेतला तर बुलढाणा जिल्ह्यातील मोजक्या नेत्यांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आंबेडकरी चळवळीतील उच्च शिक्षित नेते ऍड अर्जुनराव कस्तुरे हे जिल्ह्याचे पाहिले मंत्री ठरले. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले. यानंतर रामभाऊ लिंगाडे हे वसंत दादा पाटील, शिवाजी पाटील हे शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री राहिले. मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात भारत बोन्द्रे हे मंत्री होते. सुधाकर नाईक यांच्या काळात सुबोध सावजी आणि राजेंद्र गोडे अनुक्रमे राज्यमंत्री व उपमंत्री राहिले. युतीच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी प्रताप जाधव यांना लाल दिवा दिला. राजेंद्र शिंगणे यांना काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले. त्यांना सर्वाधिक वेळा मंत्री पदाचा मान मिळाला.

देवेंद्र फडणवीस यांच्या (२०१४ मधील) मुख्यमंत्रिपदाच्या काळात पांडुरंग फुंडकर हे कृषिमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर फडणवीस यांनी काही महिन्याकरिता संजय कुटे यांना संधी दिली. १५ डिसेंबर २०२४ च्या मुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आकाश फुंडकर यांना संधी दिली. मंत्री झालेल्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या यादीत एका युवा नेत्याची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – राज्याला मुख्यमंत्री देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही

केंद्रात हॅटट्रिक

दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात आजवरच्या काळात जिल्ह्यातील तिघा खासदारांना संधी मिळाली आहे. २०२४ मधील लढतीत सलग चौथ्यांदा खासदार झालेले प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत. त्यापूर्वी मुकुल वासनिक हे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळमध्ये केंद्रीय क्रीडा, युवा कल्याण राज्यमंत्री होते. २००९ मध्ये बुलढाणा मतदारसंघ खुला झाल्यावर ते रामटेकमधून लढून खासदार झाल्यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री झाले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना संधी दिली. याशिवाय खासदार आनंदराव अडसूळ हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ, नियोजन राज्यमंत्री होते.

Story img Loader