बुलढाणा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज बुलढाणा येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासह आलेल्या मान्यवरांचे जिल्हा प्रशासन व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वागत केले. आगमनानंतर एका विशेष वाहनात बसून ते बुलढाणा शहरात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जयस्तंभ चौक परिसरातील पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके, उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हा सरचिटणीस सतीश मेहेंद्रे, गणेशसिंह राजपूत, जाकीर कुरेशी, बबलू कुरेशी हे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यामुळे कार्यक्रम स्थळी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतल्यावर मुख्यमंत्री यांचा ताफा संगम चौकाकडे रवाना झाला.

हेही वाचा – नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार हे वडेट्टीवार यांना कोणत्या सुत्रांनी सांगितले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल

जयस्तंभ चौकातील छत्रपती संभाजी महाराज, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईमाता, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, जिजामाता व बाळ शिवाजी, वीर काशीद यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी येथील ‘एमएसआरटीसी वर्कशॉप’मागील हेलीपॅड येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.

यावेळी आयुष व आरोग्य, कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधानसभा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय रायमुलकर, तसेच विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रस्थान झाले.

हेही वाचा – पंतप्रधानांचा दौरा आणि सुरक्षेचा फास, शाळांना सुट्टी व नागरिक घरात

आमदार गायकवाड यांच्या इशाऱ्याला काँग्रेसचे उत्तर

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांना दोन दिवसांपूर्वीच खरमरीत इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेते व पदाधिकारी यांना जागीच जमिनीत गाडून टाकण्याचा इशारा देऊन त्यांनी जिल्हा काँग्रेसला एक प्रकारे आव्हानच दिले होते, हे आव्हान स्वीकारून आज गुरुवारी काँग्रेस नेते जयस्तंभ चौकमधील लोकार्पण सोहळ्यात घुसले. त्यांनी काळे झेंडे दाखवून गायकवाड यांचे आव्हान स्वीकारल्याचे दाखवून दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana attempt of congress leaders to enter cm eknath shinde convoy black flags are shown scm 61 ssb