लोकसत्ता टीम
वर्धा: नातेवाईकांच्या साक्षीने सामूहिक अंत्यसंस्कार झालेत.भावनेचा कातर स्वर हळूहळू निवळतोय. घरापासून दूरवर झालेल्या भूमीत झालेला अंत्यसंस्कार काळजाला चरे पाडून गेला.पण याला जीवन ऐसे नाव अशी स्वतःची समजून घालत आता परतीचा प्रवास करायचा तर तांत्रिक बाबी आल्याच. महत्वाचे म्हणजे कायमच्या दुरावलेल्या जिवलगाची एक शासकीय नोंद करायची आहे.
मृत्यचा दाखला महत्वाचा. कारण तिकीट वर असलेले नाव व प्रत्यक्षातील नाव यात अनेकांच्या बाबतीत घोळ झाल्याचे दिसून आले. असा फरक पुढे अडचणी निर्माण करू शकतो म्हणून मृत व्यक्तीचे आधार कार्ड प्रमाण ठरते. त्या नुसारच मृत्यू दाखला तयार करावा म्हणून तिथे उपस्थित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सतर्क केले. उपस्थित आप्तांना धीर देत बाकी सोपस्कार तिथे असलेली तहसीलदार चमू पूर्ण करेल, अशी खात्री देण्यात आली. आता उरल्या आठवणी म्हणत परतीचा प्रवास आप्त सुरू करणार.