बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात आंध्रप्रदेशमधील सुमारे ३३ भाविक जखमी झाले. त्यांच्यावर मलकापूर येथील उप जिल्हा रुग्णालय आणि बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
आंध्र प्रदेशमधील विविध जिल्ह्यातील भाविकांना घेऊन निघालेली ही खासगी बस (ट्रॅव्हल्स) मलकापूर नांदुरादरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहक ट्रकला धडकली. यामुळे झालेल्या या अपघातातील जखमी बांधवाना मुस्लीम बांधवानी सहकार्य केले. यामुळे त्यांच्या जीवावरच्या संकटात मानवतेचे व भारतीय एकात्मतेचे दर्शन घडले.
आज शुक्रवार, १८ एप्रिल रोजी उत्तररात्री तीन वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान असलेल्या काटी फाट्या जवळ ही दुर्देवी घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खासगी बस उभ्या ट्रकवर धडकली. या घटनेचा विस्तृत तपशील येथे मिळू शकला नाही. मात्र प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, भीषण दुर्घटनेत जवळपास ३३ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील किमान तिघा भविकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. हे भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हे भाविक नाशिक, शिर्डीकडे दर्शानासाठी जात होते. दरम्यान मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे हे पोलीस कर्मचाऱ्यासह रात्रीच्या विभागीय गस्तीवर असताना त्यांना अपघाताची मिळाली. घटनेची माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वडनेर भोलजी जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लीम बांधव पोलिसांच्या मदतीला धावून आले. सर्वांनी मिळून तत्काळ जखमींना उपचारासाठी मलकापूर येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. १० जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
तीन दिवसापूर्वीच…
तीन दिवसांपूर्वी याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर भीषण दुर्घटना घडली होती. मध्यप्रदेश राज्य परिवहन मंडळाची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन ३ जण ठार तर १८ जण जखमी झाले होते.