बुलढाणा: मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. बसमधील २० प्रवासी जखमी आहेत.

खामगाव -नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ ही भीषण अपघाताची घटना घडली. याच मार्गावर आठवडाभरापूर्वी तिहेरी अपघाताची घटना घडली होती. खामगाव नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ आज मंगळवार, १५ एप्रिलच्या सकाळी ही भीषण दुर्घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, मध्यप्रदेश परिवहन विभागाची बस आणि विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, यात ३ मजूर ठार तर २० जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस अमरावतीवरून बऱ्हाणपूरकडे जात होती. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, विटांची वाहतूक करणारा ट्रक ‘राँग साइड’ने जात होता. आमसरी फाट्याजवळ या दोन वाहनांची भीषण धडक झाली, यात ट्रक मधील ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. ४ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने अकोला येथे हलवण्यात आले आहे. एसटी बसमधील २० प्रवासी जखमी असून त्यांना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले आहे.

खामगाव परिसरात काही दिवसापूर्वी झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात सहा जण ठार झाले होते. तसेच १४ प्रवासी जखमी झाले होते. खामगाव शेगाव मार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात सहा जणांचे बली गेले होते. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज भीषण अपघात झाला आहे. यामुळे बुलढाणा जिल्हा पुन्हा हादरला आहे.