बुलढाणा : समृद्धी द्रुतगती महामार्ग हा लोकार्पण झाल्यापासून अपघातांनी गाजत आहे. काल गुरुवारी रात्री उशिरा झालेला अपघात मात्र अभूतपूर्व ठरला. कुत्रा अचानक आडवा आल्याने नागपूरकडे जाणारी कार भरवेगात अनियंत्रित झाली. यामुळे मधल्या ‘लेन’मधील कार बॅरिअरला जाऊन जोरात धडकली. कारचे भाग अक्षरशः हवेत उडाले. मात्र वाहनातील प्रवासी सुखरूप बचावले. देवदूत ठरलेल्या एअर बॅगमुळे ते बचावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ जानेवारी रोजी रात्री उशिरा नागपूर कॅरिडोरवर कार (एमएच१२-एफवाय-५९०१) चे चालक संकरित श्रीनिवास रेड्डी (वय २३ वर्ष राहणार अंधेरी ,मुंबई हे मुंबईवरून लग्न समारंभासाठी नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान चॅनल क्रमांक ३२६.२ जवळ कार समोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार ‘मिडीयम लेन’ कडून ‘साईड बॅरिअर’ पर्यंत फरफटत गेली. सुदैवाने सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्यामुळे व समोरील ‘एअर बॅग’ उघडल्यामुळे प्राणहानी टळली. मात्र कारचे समोरील एक्सेलसह दोन्ही चाके हवेत उडाली.वाहनाच्या मागील बाजूची सुद्धा मोठी मोडतोड झाली. दैव बलवत्तर म्हणून वाहनातील प्रवासी वाचले.

हेही वाचा…एसटी बँकेत भरती, बदल्यांमध्ये घोटाळे… कोट्यावधींचे…

श्लोक कोळमकर वय २४ वर्ष , पुष्पेन्द्र गुप्ता वय २७ वर्ष हे गंभीर जखमी झाले. डॉ. शरद शेळके व चालक दिगंबर शिंदे यांनी प्रथमोपचार करून त्यांना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. सोबतचे मोनाली टोपाल २८ वर्ष व चालक किरकोळ जखमी झाले. तसेच इंजिनचे दोन तुकडे होऊन चाके बाजूला तुटून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र पीएसआय जितेंद्र राऊत, पोलीस कर्मचारी विठ्ठल काळुसे, विजय आंधळे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे गायकवाड , पवन सुरुशे व अन्य कर्मचारी, यांनी कार महामार्गाच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी उभी केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana car accident on samriddhi expressway scm 61 sud 02