बुलढाणा : मागील काळापासून गावातील दोन भिन्न धर्मियात असलेला वाद मंगळवारी, १५ एप्रिल रोजी उफाळून आला. यामुळे खामगाव तालुक्यातील हिवरखेड या सामाजिक दृष्ट्या संवेदनशील गावात दोन्ही गट एकमेकांसमोर आले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली, परस्परांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत.

मंगळवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत दोन्ही गटातील मिळून चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह दंगा काबू पथक, हिवरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जलद कृती दल असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे हिवरखेड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणाव पूर्ण शांतता आहे.

खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे दोन गटात निळा झंडा लावण्यावरून १५ एप्रिलला वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत तसेच दगडफेकीत झाले. दरम्यान दोन्ही गटांत दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती, सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील ही धुसफूस कायम असल्याचे दिसून आले. मात्र आज मंगळवारी ती धुसफूस, दोन गटांतील जुना वाद उफाळून आला.

आज दोन्ही गट एकमेकांना भिडले, कडाक्याचा वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारी व दगदफेकीत झाले. या घटनेत अनेक जन जखमी झाले. गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर दंगाविरोधी पथकही गावात दाखल झाले आहे. सध्या हिवरखेड गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी अटक सत्र सुरु केले असून दोन्ही गटांतील ४० इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.