बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काल रविवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दोन तालुक्यांसह तब्बल १६ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. खामगावनजीक पुरात चारचाकी (कार) वाहून गेली. सुदैवाने वाहनात कोणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला.
अपुऱ्या आणि अनियमित पावसाची नोंद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि राहिवासीयांची आर्त हाक वरुण राजाने अखेर ऐकली! काल रविवारी रात्री दहा वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात कोसळत राहिला. खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्याने या दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. खामगाव तालुक्यात तब्बल ९२.८ तर मोताळा तालुक्यात ९०.४ मिलीमीटर इतक्या कोसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी, पेडका पातोंडा, आवार, नागापूर या गावात कोसळधार पावसाने काल रात्रभर हजेरी लावली. खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक वाहून गेली. सुदैवाने या कारमध्ये कुणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला! ही कार नदीच्या काठावर उभी करण्यात आली होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. याचबरोबर काठावर असलेली पान टपरीसुद्धा वाहून गेली.
हेही वाचा – राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात होणार
वाहतूक प्रभावित
दरम्यान खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने खामगाव ते नांदुरा, खामगाव ते बुलढाणा आणि खामगाव ते जालना या राज्य मार्गावरील वाहतूक किमान तीन तास बंद होती. खामगाव ते अकोला मार्गावरील कोलोरीनजीक आज सोमवारी सकाळी पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नदी नाले एक झाले. जळगाव, मोताळा तालुक्यातही वाहतुकीवर परिणाम झाला. इतर तालुक्यांतही वाहतूक प्रभावित झाल्याने नोकरदार, शालेय महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची गैरसोय झाली. दरम्यान या तुलनेत इतर तालुक्यांतील पावसाची तीव्रता कमी होती. नांदुरा ४४ मिलीमीटर, मेहकर ३४ मिमी, शेगाव ३४ मिमी, चिखली ३१, मलकापूर २८, जळगाव जामोद २६ मिमी, संग्रामपूर २३ मिमी, बुलढाणा तालुक्यात २३ मिलीमीटर पावसाने हजेरी लावली.
बुलढाणा : जिल्ह्यात काल रविवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दोन तालुक्यांसह तब्बल १६ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. खामगावनजीक पुरात चारचाकी (कार) वाहून गेली. सुदैवाने वाहनात कोणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला. pic.twitter.com/YH9WWJoYaF
— LoksattaLive (@LoksattaLive) July 8, 2024
शेकडो हेक्टर शेती पाण्यात
दरम्यान यानिमित्त पावसाच्या लहरीपणाचा प्रत्यय आला आहे. शनिवार ६ जुलै अखेर तब्बल दीड लाख हेक्टरवरील खरीपाच्या पेरण्या अपुऱ्या पावसामुळे रखडल्या होत्या. मात्र मुसळधार पावसाने आणि नदी नाले एक झाल्याने पावसाचे पाणी शेकडो हेक्टरवरील शेतात शिरले. यामुळे शेत जमीन पाण्यात बुडाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. खामगाव, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यात याचे प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी या पिकांचा पेरा झालेला असून याचे अंकुर आले आहे. मात्र आता पावसाने झालेल्या पेरण्या वाया गेल्याने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक दिवसांपासून पावसासाठी आभाळाकडे नजर लागलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रूंचा महापूर साचला आहे.
हेही वाचा – मुंबई तुंबली अन् आमदार नागपूर विमानतळावर अडकले
१६ मंडळात अतिवृष्टी
दरम्यान जिल्ह्यातील ब्यानऊ महसूल मंडळांपैकी सोळा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये एकट्या खामगाव तालुक्यातील आठ महसूल मंडळांचा समावेश असल्याचे नैसर्गिक आपत्ती कक्ष आणि खामगाव उपविभागीय कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. पातोंडा आणि आवार या गावांच्या पंचक्रोशीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही.