बुलढाणा: जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा ते विदर्भपंढरी दरम्यानच्या प्रस्तावित भक्तिमार्ग विरोधात आता जिल्हा काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आत्मक्लेश’ आंदोलन करून शासन व जिल्हा प्रशासन यांचे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हा कचेरीसमोर आज सोमवारी ( दिनांक १) आयोजित आंदोलनात जिल्हाध्यक्ष बोन्द्रे, विधानपरिषदेचे आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, चिखलीसह चार तालुक्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सिंदखेड राजा ते शेगाव या १०९ किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित भक्ती महामार्गाला हजारो शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. याउप्परही राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा अट्टाहास कायम असल्याचे चित्र आहे. भूसंपादन संदर्भातील हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. यामुळे काँग्रेसने देखील महामार्गाविरोधात आक्रमक पवित्रा घेत आज बुलढाण्यात आंदोलन केले. कुणाचीही मागणी आणि कुठलीही गरज नसताना भक्तिमार्गाचा अट्टाहास करण्यात येत असून तो तात्काळ रद्द करावा अशी काँग्रेसची मागणी आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज काँग्रेस रस्त्यावर उतरली.
दरम्यान, आज १ जुलै रोजी राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात भक्ती महामार्ग बचाव कृती समितीच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. शासनाने तातडीने हा महामार्ग रद्द करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर
यावेळी मार्गदर्शन करताना राहुल बोन्द्रे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. प्रस्तावित सिंदखेडराजा शेगाव हा भक्तिमार्ग हजारो शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आणि त्यांना विस्थापित, भूमिहीन करणारा आहे. महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित होणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ व कसदार जमीनी अधिग्रहित केल्यास जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. सिंदखेड राजा ते शेगाव जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. परंतु काही मिनिटे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणे चुकीचे आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा महामार्ग रद्द करण्यात यावा असे राहुल बोंद्रे म्हणाले. आमदार लिंगाडे यांनी राज्य सरकारच्या अट्टाहासवर टीका करून आपण सभागृहात यावर आवाज उठविणार असल्याचे सांगितले. माजी आमदार सपकाळ यांनी भक्तिमार्गाचा अट्टाहास करून सरकारला दाखवायचे तरी काय? असा संतप्त सवाल केला. सर्वपक्षीय नेते आणि विशेष म्हणजे नागरिक, ग्रामस्थांची मागणी नसताना सरकारचा भक्तीचा खटाटोप अनाठायी असल्याचे ते म्हणाले.