बुलढाणा : गेल्या दोन वर्षांत लहान-मोठ्या अपघातांमुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळेदेखील वादग्रस्त ठरत आहे. समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. यासाठी महागड्या चारचाकी वाहनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यावर कळस म्हणजे इंधन चोरीच्या या धंद्यात आता स्थानिक (बुलढाणा जिल्ह्यातील) चोरट्यांच्या टोळ्यासुद्धा उतरल्या आहेत.

लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही बाब ठळकपणे सिद्ध झाली आहे. बीबी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील चौघा आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी इंधन चोर टोळीने चोरलेले डिझेल खरेदी करणारा निघाला आहे.

चंद्रपूर कनेक्शन!

या घटनेचा चंद्रपूर जिल्ह्याशी सबंध आहे. चंद्रपूर येथील कल्याणी टॉवर येथील किरण कुमार लिंगया कनुकुंटल (३८) हे या घटनेचे फिर्यादी आहेत. किरणकुमार हे मागील १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रकने समृद्धी मार्गावरून मुंबई येथून नागपूरकडे जात होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी वरील दुसरबीड टोल नाक्याजवळ आराम करण्यासाठी आपले मालवाहू वाहन थांबविले. ते गाढ झोपेत असताना त्यांच्या वाहनातील पाऊण लाख रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची समोरील काच फोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी किरण कुमार लिंगया कनुकुंटल यांनी बीबी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…

असा लागला छडा

कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना घटनेचा तपास करण्याचे आव्हान ठाणेदार संदीप पाटील, त्यांचे सहकारी परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवींद्र बोरे यांनी यशस्वी रित्या पेलले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे त्यांनी आरोपींचा छडा लावला. यानंतर २० डिसेंबर रोजी चिखली पोलीस हद्दीतील गजानननगर चौफुली भागात छापा घातला. यावेळी लक्ष्मण उर्फ संतोष गुलाब लहाने (२७, राहणार खंडाला मकरध्वज, तालुका चिखली), निलेश संतोष भारूडकर(३३, राहणार सातगाव भुसारी, तालुका चिखली) आणि देविदास प्रकाश दसरे (२८, राहणार साखर खेरडा, तालुका सिंदखेडराजा) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या जवळील स्कारपीओ , स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. तसेच ३५ लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक कॅन देखील जप्त करण्यात आल्या. या तिघांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी त्यांच्या चौथ्या सहकाऱ्याची माहिती दिली. २१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा देऊळगाव घुबे येथील रहिवासी आरोपी सचिन परशराम घुबे (२१) याला अटक करण्यात आली. त्याने डिझेल खरेदी केल्याची कबुली दिली. या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी एक वाहन जप्त

दरम्यान, २१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई पूर्ण करून बीबीकडे जात असताना पोलिसांना एक संशयास्पद स्कारपीओ वाहन आढळून आले. त्याला थांबविले असता त्यातील व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्या वाहनात १८ लिटरच्या कॅन सापडल्या.

हेही वाचा : प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…

खामगावनजीक ‘बर्निंग कार’चा थरार… एकाचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावनजीकच्या राष्ट्रीय मार्गावर रविवारी, २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या विचित्र अन् भीषण अपघातात एकाचा जळून मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आणि मराठवाड्यातील लातूर येथील रहिवासी आहेत. ते उज्जैन (मध्य प्रदेश) कडे दर्शनासाठी जात असताना वाटेतच ही भीषण दुर्घटना घडल्याने दर्शनाची त्यांची मनोकामना अपूर्णच राहिली!

प्राप्त माहितीनुसार नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव शहरानजिक ही दुर्घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या या ( एम एच २४ एडब्ल्यू ७९०४ क्रमाकाच्या) कारचे टायर फुटल्याने वाहन दुभाजकावर आदळले. त्यामुळे ‘शॉर्ट सर्किट’ झाल्याने पेट्रोल टाकीचा जळून स्फोट झाला .यामुळे कारमधील चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या शरीराचा कोळसा झाल्याचे दृश्य बघ्यांचे मन हेलावून टाकणारे होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पेटलेल्या कारमधून एका महिलेसह चार व्यक्तींना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. अरुण बाबुराव चिंचनसुर, असे मृताचे नाव आहे. या दुर्घटनेत परुत अरुण चिंचनसुरे (३६ वर्षे) आशीष अरुण चिंचनसुरे (३२ वर्षे), लक्ष्मी अरुण चिंचनसुरे ६१ वर्षे आणि शारदा पुणे (५५ वर्षे) हे चारजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्व एकाच कुटुंबातील आणि लातूर येथील रहिवासी आहेत. ते उज्जैन येथे दर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळाली.

Story img Loader