बुलढाणा : जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून परिचित खामगाव मधील अजब चोरीचा असा गजब तपास लागला आहे. फारसे पुरावे आणि साक्षीदार नसताना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी बजावली आहे. थेट गुजरात राज्यातून दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यात येऊन अपराध करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाला यश मिळाले आहे. या कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोपीला गुजरात राज्यातील उधना (जिल्हा सुरत ) येथून जेरबंद करण्यात आले आहे.

त्याच्याकडून मध्यप्रदेश मध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेले साडेचार लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. फारसे पुरावे नसताना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आरोपीला अटक करुन बुलढाणा येथे आणण्यात आले असून त्याचा जिल्ह्यातील अन्य चोरी वा घरफोडीच्या घटनेत सहभाग आहे का? याची कसून चौकशी व तपास करण्यात येत आहे.

गेल्या काळात खामगाव व शेगावमध्ये झालेल्या घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी गंभीर दखल घेतली. खामगाव येथील धाडसी घरफोडीच्या घटनेत लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. या घरफोडीचा तपास खामगाव पोलिसासाठी एक कडवे आव्हान ठरले होते. या गुन्ह्यांचा सखोल तपास व गुन्ह्याची उकल करत आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, यांनी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी त्यांच्या अधिनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार केली.त्यांना जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. खामगाव पोलिसांच्या अभिलेखावर दाखल असलेला पवन बाळकृष्ण अहीर (रा. सावजी ले-आऊट, खामगाव) यांच्या घरफोडीचा गुन्हा तपासावर घेतला. गोपनीय खबरे व तांत्रिक माहिती काढली असता, गुन्ह्यामध्ये उधना (जि. सुरत) येथील अट्टल चोरटा तेजपालसिंग निहालसिंग भाटिया (वय ३३ वर्षे) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक पानसरे यांनी आंतरराज्यीय तपासाचे सर्व सोपास्कार पार पाडले. स्थागुशाचे अशोक लांडे, खामगाव शहरचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस अंमलदार एजाज खान, दिगंबर कपाटे, अजीज परसुवाले, पोलीस अंमलदार शिवानंद हेलगे यांच्यासह खामगाव शहरचे पोलीस उप निरीक्षक राजेश गोमासे, अंमलदार सागर भगत, निशांतकुमार, तांत्रिक विश्लेषक कैलास ठोंबरे, ऋषीकेश खंडेराव यांनी गुजरातस्थित उधना (जिल्हा सुरत) गाठले. त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी तेजपालसिंग भाटीया याला बेड्या ठोकल्या.

सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या तेजपालसिंगला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली, तसेच उपरोक्त घरफोडीत लंपास केलेले ६० ग्रॅम सोने (किंमत ४ लाख ५० हजार रुपये), १०० ग्रॅम चांदी (किंमत ८ हजार रुपये), असा एकुण ४ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मध्यप्रदेशातील बलवानी (जिल्हा बडवानी) येथून पथकाच्या स्वाधीन केला. त्यामुळे उपरोक्त गुन्हा उघडकीस आला.

आरोपी भाटिया त्याच्या साथीदारांसह विविध शहरातील उच्चभ्रू वस्तीतीत बंद असलेल्या घरांची रेकी करतात. सदर घरांमध्ये कोणी राहत नसल्याची खात्री करतात. त्यानंतर रात्रीच्या दरम्यान बंद घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करतात. त्यानंतर घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य मौल्यवान वस्तू चोरुन पोबारा करतात. त्यांची ही कार्य पद्धती देखील तपासात सहायक ठरली.

Story img Loader