बुलढाणा : मागील काळात जे झाले ते झाले, आता मात्र पक्षविरोधी कारवाया करणारे नेते, बंडखोरांची पदाधिकाऱ्यांची थेट काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा येथे आज, मंगळवारी बुलढाणा, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांची संयुक्त विधानसभापूर्व तयारी बैठक पार पडली. बुलढाणा अर्बन कृत सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात उशिरा पार पडलेल्या या बैठकीत मुख्य मार्गदर्शन करताना प्रभारी चेन्नीथला यांनी हा इशारा दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय बैठकीला जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश समितीचे पदाधिकारी श्याम उमाळकर, संजय राठोड, जयश्री शेळके, आमदार राजेश एकडे, धीरज लिंगाडे, अमित झनक, माजी आमदार दिलीप सानंदा, आणि बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते, पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधीही हजर होते. संयुक्त बैठकीमुळे सभागृह कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी तुडुंब भरल्याचे दिसून आले. यावेळी थोरात, वडेट्टीवार, सतेज पाटील, लिंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी बैठकीची पार्श्वभूमी, उद्देश विशद केला.

हेही वाचा – उदय सामंत म्‍हणतात, ‘आपल्‍या नेत्‍यांवर टीका खपवून घेऊ नका…’

पक्षविरोधी कारवाया, बेशिस्तपणा खपवून घेणार नाही

आता पक्षात बेशिस्त आणि बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही. आगामी काळात आणि विधानसभा निवडणुकीत बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया करणारे नेते आणि पदाधिकारी यांना थेट पक्षातून काढून टाकले जाईल. उमेदवारीसाठी टोकाची स्पर्धा आहे. एकेका मतदारसंघातून अनेकांनी जिल्हा वा राज्य काँग्रेस समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ज्याला उमेदवारी मिळाली त्याचे काम इतरांनी प्रामाणिकपणे करावे. यात कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा सहन केल्या जाणार नाही, असा दम चेन्नीथला यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा – ‘सरकारी तिजोरीची अक्षरशः उधळपट्टी; टेंडर काढणे व कमिशन खाणे…’ विजय वडेट्टीवार यांची टीका

जिल्हानिहाय बैठका

प्रारंभीच्या सत्रात बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात मोजक्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. दुपारी जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. प्रथम वाशीम, संध्याकाळी अकोला, अंतिम सत्रात बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांत जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय काँग्रेसची स्थिती, अपेक्षित जागा, लोकसभा निवडणुकीमधील स्थिती, इच्छुक उमेदवारांची संख्या, संघटन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कामगिरी याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana direct expulsion of rebels now announcement of congress leader ramesh chennithala scm 61 ssb