बुलढाणा : बोराखेडी पोलीस ठाणेच नव्हे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलासाठी दाभाडी येथील दरोडा तपासाच्या दृष्टीने कडवे आव्हान ठरले आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. केवळ चाळीस हजारांच्या दागिण्यासाठी एका निष्पाप महिलेचा जीव घेतला गेला. तसेच तिच्या पतीला गंभीर जखमी करण्यात आले. सुदैवाने या दाम्पत्याची एकुलती एक कन्या गावाबाहेर गेली असल्याने बचावली. मात्र अल्पवयात तिने आईचे छत्र गमावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेची गुंतागुंत लक्षात घेता तपास अधांतरीच असून दरोडेखोरांचा शोध घेण्यात बोराखेडी पोलिसांना यश मिळाले नाही, असे घटनेच्या दुसऱ्या दिवशीचे चित्र आहे. मोताळा तालुक्यातील दाभाडी या गावात १९ जानेवारीला पहाटे हा दरोडा पडला. पशुचिकित्सक असलेले डॉक्टर गजानन टेकाडे (४२) आणि त्यांच्या पत्नी माधुरी टेकाडे (३५) हे दोघेच घरी होते. दहावीत शिकणारी मुलगी सृष्टी (१६) ही क्रीडा स्पर्धेसाठी शिर्डी येथे गेली होती. अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने घरात प्रवेश केला. या वेळी टोळीकडून गुंगीच्या औषधाचा जास्त वापर करण्यात आला असावा असा अंदाज आहे. याचे कारण गजानन टेकाडे हे काल रविवारी सकाळी त्यांचे नातेवाईक आले तेव्हाही बेशुद्धच होते. रविवारी त्यांना जळगाव खान्देश येथील रुग्णालयात भरती करण्यात आले, तेव्हा ते संध्यकाळपर्यंत बेशुद्धच होते. आज सोमवारी ते शुद्धीवर आल्याचे सांगण्यात आले. मात्र ते फारसे बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. माधुरी टेकाडे या मृतावस्थेत पडल्या होत्या.

हेही वाचा – भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप

१९ जानेवारीच्या सकाळपासूनच दाभाडी या गावाला लष्करी छावनीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस अधीक्षकांसह, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अन्य वरिष्ठ व अनुभवी पोलीस अधिकारी, विविध शाखांचे प्रमुख, श्वान पथक, हस्तमुद्रा तज्ज्ञ गावात दाखल झाले. घटनेच्या तपासासाठी तीन पथक गठीत करण्यात आले. ठाणेदार सारंग नवलकार तपास करीत आहेत. मात्र हा तपास स्थानिक गुन्हे शाखा वा अन्य यंत्रणेकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – कठोर पोलीसही हळहळले…‘लुसी’ला अखेरची सलामी देताना…

किरकोळ जखमी करून लूटमार करणे अशी दरोदडेखोरांची आजवरची पद्धत राहिली आहे. मात्र या घटनेत दरोडेखोरांनी महिलेचा जीव घेण्यास मागेपुढे पहिले नाही. टेकाडे यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन अलीकडेच सीसीटीव्ही यंत्रणा विकत आणली होती असे आढळून आले. मात्र काही कारणामुळे ती कार्यान्वित करण्याचे राहून गेले. ही यंत्रणा सुरु असती तर कदाचित महत्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले असते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana district dabhadi robbery woman murder scm 61 ssb