संजय मोहिते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विषय लांबणीवर पडला असतानाच आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याला तिसऱ्यांदा लाल दिवा मिळणार काय? असा राजकीय प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबद्दल राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य जिल्हावासीयांत उत्सुकता निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्हा व लोकसभा मतदारसंघ प्रगतीच्या दृष्टीने मागासलेला राहिला असला तरी राजकारणात महत्वाचे केंद्र आहे.

लोकसभा मतदारसंघाने तर काही दशके ‘व्हीआयपी’ मतदारसंघ असा लौकिक मिळविला. तत्कालीन नागपूरकर युवानेते मुकुल वासनिक यांनी बुलढाण्यातुन १९८४ मध्ये सर्वप्रथम निवडणूक लढविली. तेंव्हा ते एनएसयुआय चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. जेमतेम पंचविशी पार करणारे वासनिक तेंव्हाच्या सभागृहातील सर्वात लहान खासदार ठरले. १९८९ च्या लढतीत सामान्य कार्यकर्ते असलेले भाजपचे उमेदवार सुखदेव काळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे काळे’ ‘जायंट किलर’ ठरले.

हेही वाचा >>> नागपूर पोलिसांचा वाहतूक नियंत्रणावर नव्हे तर वसुलीवर भर!

वासनिक तेंव्हा एन्एसयुआय चे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने बुलढाण्याच्या निकालाची राष्ट्रीय राजकीय वर्तुळ व प्रसिद्धी माध्यमांनी दखल घेतली. त्यांना हरविणारा काळे नामक व्यक्ती आहे तर कोण? असा प्रश्न पडलेल्या माध्यमांनी त्यांचाही पिच्छा पुरविला. गांधी घराण्याचे निष्ठावान असलेल्या वासनिकांनी बुलढाण्यातुन ७ वेळा निवडणुका लढल्या. त्यांच्या प्रचारासाठी राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी यांनी प्रचार सभा घेतल्या.

नव्वदीच्या दशकात पहिला दिवा

राजकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाऱ्या वासनिकांना  १९९१ च्या निवडणुकीतील विजयानंतर   पंतप्रधान पी. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय क्रीडा, युवा कल्याण, मानव संसाधन राज्य मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली.  बुलढाणा जिल्ह्याला मिळालेला तो पहिला (केंद्रकृत) लाल दिवा ठरला.

शिवसेनेलाही संधी

 दरम्यान माजी केंद्रीय मंत्री व खासदार असलेल्या वासनिकांना १९९६ च्या लढतीत मुंबईकर आनंदराव अडसूळ यांनी पराभूत केले. यामुळे मतदारसंघाचा निकाल पुन्हा गल्ली ते दिल्ली चर्चेचा विषय ठरला. कामगार नेते असलेले अडसूळ बुलढाणेकरांच्या आशीर्वादाने राजकीय नेते ठरले. ध्यानीमनी नसताना त्यांनाही लालादिवा मिळाला. ते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थ- नियोजन राज्यमंत्री राहिले.

खासदार जाधवांचा ‘प्रताप’ सिद्ध होणार?

या रंजक पार्श्वभूमीवर लवकरच होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रतापराव जाधव यांना लालादिवा मिळणार का? अशी चर्चा गल्ली ते दिल्ली सुरू झाली आहे. राजकारणातील दीर्घ अनुभव,  सलग तीन टर्म खासदारकी, दिल्ली दरबारी असलेले संबंध, केंद्रीय समिती अध्यक्ष पदाचा अनुभव , मुख्यमंत्र्यासोबत असलेले घनिष्ठ संबंध या बाबी त्यांना अनुकूल ठरणाऱ्या आहे.मात्र शिंदे गटाच्या वाट्यावर असलेल्या मर्यादित(२) जागा,  पक्षांतर्गत चुरस या बाबी त्यांच्या साठी अडचणीच्या ठरु शकतात. यावर मात करून  संधी मिळते का? हा प्रश्न आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला तिसऱ्यांदा (केंद्रकृत) लाल दिवा मिळतो का, याबद्धल जिल्ह्यात व्यापक उत्सुकता निर्माण झाली.