बुलढाणा : जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १० ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढल्याचे वृत्त आहे. प्रारंभी मागे पडलेल्या महिला मतदारांनी पुरुषांना मागे टाकले.
पहिल्या दोन तासांत साडेनऊअखेर सार्वत्रिक लढतीत जिल्ह्यात सरासरी ९ टक्के मतदानाची नोंद झाली. महिलांच्या तुलनेत पुरुष मतदार आघाडीवर होते. पोटनिवडणुकीत ११ टक्केच मतदानाची नोंद झाली. ४८ ग्रामपंचायततींच्या सार्वत्रिक व थेट सरपंच पदाकरिता तसेच १० ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी १८२ केंद्रांवरून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान मतदारांचा निरुत्साह दिसून आला. दुसऱ्या टप्प्यातही (साडेअकरापर्यंत) निरुत्साह कायम होता.
हेही वाचा – धाड मध्ये उभे राहणार दिमाखदार शिवस्मारक; पायाभरणीत गडकिल्ल्यांची माती अन् जल!
मध्यान्हनंतर मात्र वेग वाढला. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४२.४८ मतदानाची नोंद झाली. ९६ हजार ९७० पैकी ४०,९०३ ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिलांनी (२०९८३) आघाडी घेतली. १९९२० पुरुषांनी मतदान केले.
हेही वाचा – अकोला : “सर्वपक्षीय भ्रष्ट नेत्यांची भाजपामध्ये एकजूट”, विश्वंभर चौधरी यांची खरमरीत टीका
देऊळगाव राजा आघाडीवर
देऊळगाव राजा ५० टक्के, सिंदखेडराजा ४९, मेहकर ४७, लोणार ४६ तर मलकापूर ४६ टक्के या तालुक्यात उत्साही मतदान झाले. उर्वरित ८ तालुक्यांतील मतदान मात्र ३७ टक्क्यांच्या आसपास रेंगाळले.