बुलढाणा : रविवारी ७ जुलैला सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील तब्बल पंधरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे सर्वत्र प्रामुख्याने शेतात पाणीच पाणी जमा झाले आहे . यापरिनामी लाखो हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत.
खामगाव तालुक्यातील आवार महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली असून काही तासांतच विक्रमी असा दोनशे विस मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खामगाव तालुक्यातील इतर सात मंडळाना पासष्ट ते एकशे एकोणविस मिलिमीटर दरम्यान धोधो पावसाने झोडपले. त्यामुळे खामगाव तालुक्यात पाणीच पाणी चोहिकडे असे चित्र असून हजारो हेक्टरवरील शेतजमिनीत तलाव तयार झाले आहे.
हेही वाचा : वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मोताळ्यातही कहर
मोताळा तालुक्यातही रविवारच्या रात्री पावसाने कहर केला असून तब्बल पाच महसूल मंडळात अतिवृष्टी ( ६५ टक्के पेक्षा जास्त पाऊस) ची नोंद झाली आहे. बोराखेडी मंडळात तर पावसाने कहर केला. मंडळात विक्रमी इतक्या १६८. २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचा अंदाज आहे.
मोताळा महसूल मंडळात ७२.५० मिलिमीटर, धामणगाव बढे महसूल मंडळात ७४.२५ मिलिमीटर, पिंप्री गवळी मंडळात ७८.७५ मिलिमीटर, रोहिणखेड मंडळात ७४.२५ तर शेलापूर मंडळात ७४ मिलिमीटर इतका कोसळधार पाऊस झाला आहे.मेहकर तालुक्यातील कल्याणा महसूल मंडळात ८३.२५ मिलिमीटर इतक्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
हेही वाचा : गुजरातमध्ये वातावरण बदलतेय….केवळ संघ आणि भाजपचा पराभव हाच आमचा…..
यामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवर करण्यात आलेल्या खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्याची भीती वजा शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतर अकरा तालुक्यांचा तुलनेत खामगाव आणि मोताळा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सात लाख पस्तीस हजार हेक्टरवर यंदा पेरण्या झाल्या आहेत. यात चार लाखांच्या आसपास सोयाबीन तर सुमारे पावणे दोन लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. शेतात तलावसारखे पाणी जमा झाल्याने आणि त्याचा निचरा लवकर होणार नसल्याने पेरण्या उलटण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा स पारावर उरणार नाही असे भीषण दुर्देवी चित्र आहे.
गारडगावला पुराचा वेढा
दरम्यान, खामगाव तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस कोसळल्याने नदी नाले एक झाले. नदीला आलेल्या पुरामुळे सुप्रसिध्द गारडगाव या गावाला आज सोमवारी ( दिनांक ८) पुराचा वेढा पडला होता. तब्बल चार तास हा वेढा कायम असल्याने गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटला होता. येथे विदर्भातील सुप्रसिद्ध बुद्ध विहार असून त्याचे उदघाटन धर्म गुरू दलाई लामा यांच्या हस्ते झाले होते. पण संध्याकालसून हा पूर ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या सूत्रांनी याची पुष्टी दिली.
हेही वाचा : अकोला जिल्ह्यात कोसळधारा! घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू; ८३ घरांची पडझड, दोन तालुक्यात अतिवृष्टी
वाहतूक सुरळीत
दरम्यान, पुराचे पाणी ओसारल्याने आणि आज मंगळवारी पावसाचा जोर कमी झाला. यामुळे जिल्ह्यातील विविध मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. रविवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने खामगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. खामगाव ते जालना, खामगाव ते बुलढाणा आणि खामगाव ते नांदुरा या दरम्यानची वाहतूक बंद झाली होती. आज ८ जुलै रोजी सकाळी ते दुपार पर्यन्त वाहतूक प्रभावित राहिली. यामुळे वाहनधारक आणि हजारो प्रवाश्यांना ताटकळत बसावे लागले. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार जिल्हा मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. तसेच विविध मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली .